गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; ‘तुळशी’ TBM द्वारे ६४ मीटर बोगदा खोदकाम पूर्ण
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या भूमिगत दुहेरी बोगदा कामाला वेग आला आहे. ‘तुळशी’ TBM द्वारे ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले असून ‘विहार’ TBM ची जोडणी ९२ टक्के पूर्ण झाली आहे. दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम २२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२६ : मुंबईतील महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत भूमिगत दुहेरी बोगद्याच्या कामाला वेग आला आहे. गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे बोगदे बांधण्यात येत आहेत.
या प्रकल्पातील ‘तुळशी’ या पहिल्या बोगदा खणन संयंत्राद्वारे आतापर्यंत ६४ मीटर बोगदा खोदकाम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या ‘विहार’ TBMच्या सुट्या भागांची जोडणी ९२ टक्के पूर्ण झाली आहे. दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बोगदा खणनाची कार्यपद्धती, सुरू असलेले खोदकाम, प्रकल्पाची सद्यस्थिती, कामाची प्रगती आणि विविध तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती घेतली.
तसेच कार्यस्थळावरील सुरक्षितता, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, बांधकामाची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन यांचाही त्यांनी आढावा घेतला.
‘तुळशी’ TBM द्वारे ६४ मीटर खोदकाम
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम ‘तुळशी’ या अवाढव्य TBMद्वारे सुरू आहे. हे संयंत्र १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले.
आतापर्यंत ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, या खोदकामादरम्यान बोगद्याच्या बांधकामातील महत्त्वाचा भाग असलेल्या २७ कंकणाकृती कडांची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय तात्पुरत्या स्वरूपातील आणखी २ कंकणाकृती कडांची उभारणी करण्यात आली आहे.
प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे जुळे बोगदे
दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडमधील खिंडीपाडा या दरम्यान जुळे भूमिगत बोगदे बांधण्यात येत आहेत. एकमेकांना समांतर असलेल्या या दोन्ही बोगद्यांची प्रत्येकी लांबी ४.७० किलोमीटर आहे.
या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर, तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात तो १३ मीटर आहे. प्रकल्पाच्या व्यापक आराखड्यानुसार गोरेगाव (पूर्व) ते मुलुंड (पश्चिम) या जोडणीमध्ये सुमारे ५.३० किलोमीटर लांबीचे आणि प्रत्येकी तीन मार्गिकांचे दुहेरी बोगदे बांधले जात आहेत.
अत्याधुनिक ‘तुळशी’ TBMची वैशिष्ट्ये
‘तुळशी’ बोगदा खनन संयंत्र हे सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) हार्ड रॉक प्रकारातील आहे. त्याच्या कटरचा व्यास १४.४९ मीटर, तर संयंत्राची एकूण लांबी ८३ मीटर आहे.
यामध्ये २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि ६१ मीटर लांबीची तीन मजली बॅकअप गॅन्ट्री समाविष्ट आहे. या TBMमध्ये पूर्णपणे स्वयंचलित मलबा हाताळणी प्रणाली बसविण्यात आली आहे.
यामध्ये ३४० मीटर लांबीची कन्व्हेयर प्रणाली, क्रॉस कन्व्हेयर आणि स्टॅकर कन्व्हेयर यांचा समावेश आहे. त्यामुळे आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीतही मलब्याची कार्यक्षम वाहतूक, उत्पादनक्षमता आणि सुरक्षित कामकाजाला मदत होत आहे.
‘विहार’ TBMची जोडणी ९२ टक्के पूर्ण
‘तुळशी’ TBMद्वारे एका बोगद्याचे खोदकाम सुरू असतानाच प्रकल्पस्थळी दुसऱ्या ‘विहार’ TBMच्या सुट्या भागांची जोडणी ९२ टक्के पूर्ण झाली आहे.
संपूर्ण यंत्रणा प्रकल्पस्थळी स्थापित झाल्यानंतर तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित काम योग्य प्रकारे सुरू आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी Site Acceptance Test (SAT) घेण्यात येणार आहे.
ही चाचणी १३ ऑक्टोबर २०२६पासून सुरू करण्यात येणार असून, सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२६पासून दुसऱ्या बोगद्याचे प्रत्यक्ष खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.
प्रकल्पाच्या प्रगतीसाठी ‘डॅशबोर्ड’ तयार करण्याचे निर्देश
आढावा बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बोगदा प्रकल्पाच्या कामकाजासाठी स्वतंत्र ‘डॅशबोर्ड’ तयार करण्याचे निर्देश दिले.
या डॅशबोर्डमध्ये कामकाजाची टक्केवारी, प्रकल्पाची सद्यस्थिती, बोगदा खोदकामाची प्रगती, दररोज होणारे खोदकाम, अपेक्षित पूर्णता, सुरक्षा आणि वेळापत्रक यांची माहिती दर्शविण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
यामुळे प्रकल्पाची प्रगती एका नजरेत समजण्यास मदत होईल आणि संबंधित अधिकारी व अभियंत्यांना प्रकल्पाच्या सद्यस्थितीची पारदर्शक माहिती उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कामाच्या वेगासोबत सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य
अभिजीत बांगर यांनी सांगितले की, प्रकल्पांतर्गत बोगदा खणनाचे काम सुरू झाले असून एका बाजूने सुमारे ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. निर्धारित कालमर्यादेनुसार कामाची गती सातत्याने कायम ठेवणे आवश्यक आहे.
खोदकामात कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामाची प्रगती, उपलब्ध यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी आणि मनुष्यबळाची आवश्यकता यांचा नियमित आढावा घेऊन गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बोगदा खणनाचे काम तांत्रिक आणि आव्हानात्मक स्वरूपाचे असल्याने कामाच्या वेगासोबत कामगार आणि अभियंत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बोगदा खणनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित सुरक्षा मानके आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध ठेवावीत तसेच संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना देण्यात आले.
फेब्रुवारी २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प हा मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून तो फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि कार्यक्षमतेने काम करावे, तसेच प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0