रायपूरमध्ये ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त रायपूर येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकनृत्य, संगीत, पारंपरिक कला आणि गणेशभक्तीच्या विविध कलाविष्कारातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन रसिकांना घडले.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
रायपूरमध्ये ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर
रायपूर, दि. २४ : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव राज्याच्या सीमांपलीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे रायपूर येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बुधवार, २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मंडळ, जी.ई. रोड, चौबे कॉलनी, रायपूर येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थित रसिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची अनोखी अनुभूती दिली.
लोकनृत्य, पारंपरिक कला, संगीत तसेच गणेशभक्तीच्या विविध सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची राज्याबाहेर ओळख निर्माण करण्याचा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
गणेशभक्ती आणि लोककलेचा अनोखा संगम
महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये श्रीगणेशाला विशेष स्थान आहे. ग्रामीण आणि शहरी लोकजीवनाशी जोडलेल्या विविध लोककलांच्या माध्यमातून गणेशभक्ती, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. ‘लोककलेतील श्रीगणेश’ या कार्यक्रमातून याच परंपरेचा प्रभावी जागर करण्यात आला.
रायपूरमधील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच महाराष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महाराष्ट्र मंडळाचे विशेष सहकार्य
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र मंडळ, रायपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय मधुकर काळे, उपाध्यक्ष गीता श्याम दलाल आणि सचिव चेतन दंडवते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
महाराष्ट्र मंडळ, रायपूर हे गेल्या अनेक दशकांपासून रायपूरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असून, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम सातत्याने करत आहे.
खासदारांकडून उपक्रमाचे कौतुक
रायपूरचे खासदार अग्रवाल यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश देत महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा राज्याबाहेर प्रसार करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख राज्याबाहेरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
रायपूर येथे या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्राच्या लोककला, गणेशभक्ती आणि सांस्कृतिक परंपरेबद्दल असलेल्या रसिकांच्या आत्मीयतेचे दर्शन घडविणारा ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी महाराष्ट्र मंडळ, रायपूरचे पदाधिकारी, कलाकार आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0