सोलापुरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन व उडीद पिकांची पाहणी केली.

Sep 24, 2026 - 22:47
 0  5
सोलापुरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, सोलापूर दुष्काळ, कारंबा, शेतकरी मदत, पीक नुकसान, सोयाबीन नुकसान, उडीद नुकसान, सरसकट मदत, पंचनामा, उजनी धरण, चारा व्यवस्था, पिण्याचे पाणी, सोलापूर जिल्हा

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

सोलापूर, दि. २३ (जिमाका) : सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या सुमारे ५० टक्के राहिल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे विशेषतः सोयाबीन आणि उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन आणि उडीद पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच पिकांची सद्यस्थिती आणि पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, माजी आमदार राम सातपुते, दिलीप माने, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पंचनामे नियमानुसार; सरसकट मदतीसाठी प्रयत्न

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे नियमानुसार करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्ष शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मदत देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. शासनाची मदत थेट संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात १३० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध

पिकांचे नुकसान झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यात जवळपास १३० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

ज्या भागांमध्ये चाऱ्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी इतर भागांतून चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व भागांत आवश्यक प्रमाणात चारा उपलब्ध राहावा यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल. आवश्यकता भासल्यास चारा छावण्या सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार

सोलापूर जिल्ह्यातील अनेक लहान आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उजनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काही भाग पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उजनी धरणातील गाळ काढण्याच्या कामाला गती

उजनी धरणातील गाळ काढण्याबाबतही शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. राज्यातील मोठ्या धरणांमधील गाळ काढण्याच्या धोरणात उजनी धरणाचाही समावेश करण्यात आला आहे.

धरणातील गाळ काढल्यामुळे भविष्यात पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच काढलेल्या गाळाचा शेतीसाठी उपयोग करण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाने उजनीसह पाच मोठ्या धरणांमधील गाळ काढण्यासंदर्भातील सुधारित धोरणास मान्यता दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रशासनाला पाणी आणि चारा नियोजनाच्या सूचना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सोलापूर जिल्ह्यातील पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता, चारा व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत वेळेत मिळावी, उपलब्ध संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करावा तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पीक नुकसान, पाणीटंचाई आणि चारा व्यवस्थापन या तिन्ही बाबींवर प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणीदरम्यान भर दिला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.