महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा; राज्यपालांकडून सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक
महाराष्ट्र लोकभवन येथे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बंगाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.
सोलापूर प्रतिनिधी: सचिन पवार
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र लोकभवन येथे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्रासह देशभरातील पश्चिम बंगालच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांनी विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांचा व्हिडिओ संदेश प्रदर्शित करण्यात आला. यानंतर पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक परंपरा, इतिहास आणि वारशाचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
महाराष्ट्र आणि बंगालची सांस्कृतिक नाळ समान
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ही राज्ये भौगोलिकदृष्ट्या सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरावर असली तरी दोन्ही राज्यांतील लोकांची सांस्कृतिक अस्मिता आणि राष्ट्रभावना समान आहे.
इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रवादाच्या मूल्यांनी दोन्ही राज्यांना एकत्र बांधले आहे. गौरांग महाप्रभू, संत तुकाराम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीत मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव
राज्यपालांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली. पश्चिम बंगालने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बिपीनचंद्र पाल यांसारखे नेते दिले, तर महाराष्ट्राने लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यांसारख्या थोर नेत्यांचे योगदान देशाला दिले.
बंगालने साहित्य, संगीत आणि संस्कृती क्षेत्रात देशाला अमूल्य योगदान दिले असून ‘आज बंगाल जे विचार करतो, तो देश उद्या विचार करतो’ असे म्हटले जाते, असेही त्यांनी नमूद केले. ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ ही दोन्ही राष्ट्रीय गीते बंगालच्या सुपुत्रांनी देशाला दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण
कार्यक्रमात सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दुर्गापूजेवरील प्रसिद्ध बंगाली गीत ‘हे लो गिरी सुनो खोबोर’, पश्चिम बंगालच्या अजरामर व्यक्तिमत्त्वांवर आधारित एकपात्री सादरीकरण, लोकनृत्य तसेच कथक नृत्य सादर केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीत आणि नृत्य कार्यक्रमातून पश्चिम बंगालची समृद्ध सांस्कृतिक परंपरा प्रभावीपणे उलगडून दाखविण्यात आली.
कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबईतील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0