सिंहस्थ २०२७ पूर्वी निर्माल्य व्यवस्थापनाचा आराखडा; मंदिर संस्थानांचा कुंभमेळा प्राधिकरणासोबत पुढाकार
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने निर्माल्य व्यवस्थापनासाठी व्यापक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. मंदिर स्तरावर निर्माल्य संकलन, वैज्ञानिक प्रक्रिया आणि ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेद्वारे रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे.
नाशिक ब्यूरो:
नाशिक, दि. १९ जून २०२६ : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने निर्माल्य व्यवस्थापनासाठी व्यापक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. मंदिरांमध्ये जमा होणाऱ्या निर्माल्याचे स्वतंत्र संकलन, वैज्ञानिक प्रक्रिया आणि त्यापासून उपयुक्त उत्पादने तयार करण्यासाठी मंदिर संस्थाने, शासकीय यंत्रणा आणि निर्माल्य प्रक्रिया संस्थांच्या समन्वयातून विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
यासंदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस सहधर्मादाय आयुक्त विवेक सोनुने, एम. पी. पवार, विविध पुरोहित संघटनांचे प्रतिनिधी, प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त तसेच नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि निर्माल्य प्रक्रिया क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंदिर स्तरावर स्वतंत्र निर्माल्य संकलन व्यवस्था
बैठकीत मंदिर स्तरावर निर्माल्याचे वर्गीकरण करून स्वतंत्र संकलन व्यवस्था निर्माण करणे, गोदावरी नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये निर्माल्य टाकणे रोखणे तसेच त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंदिर परिसरात स्वतंत्र निर्माल्य संकलन केंद्रे उभारणे, नियमित संकलन व्यवस्था विकसित करणे आणि प्रक्रिया संस्थांच्या माध्यमातून निर्माल्यापासून विविध उपयुक्त उत्पादने तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला.
‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर
आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ही केवळ धार्मिक आयोजनाची संधी नसून लोकसहभागातून कायमस्वरूपी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याची मोठी संधी आहे. मंदिर संस्थाने या उपक्रमातील सर्वात महत्त्वाचे भागीदार असून भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापनही तितक्याच जबाबदारीने होणे आवश्यक आहे.
मंदिर संस्थाने आणि निर्माल्य प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे असे मॉडेल उभारण्याचा प्रयत्न आहे, जे केवळ कुंभमेळ्यापुरते मर्यादित न राहता दीर्घकालीन पर्यावरणपूरक व्यवस्थेचे उदाहरण ठरेल.
कंपोस्ट खत, अगरबत्ती आणि रोजगारनिर्मिती
निर्माल्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत, अगरबत्ती तसेच इतर पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्याच्या विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या उपक्रमामुळे महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कुंभमेळा प्राधिकरण या उपक्रमासाठी समन्वय, आवश्यक परवानग्या आणि अंमलबजावणीवर देखरेख करणार आहे. मंदिर संस्थाने निर्माल्याचे मूळ ठिकाणी वर्गीकरण, भाविकांमध्ये जनजागृती आणि संकलनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करतील. तर निर्माल्य प्रक्रिया संस्था संकलन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धित उत्पादने निर्मितीची जबाबदारी पार पाडतील.
पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श मॉडेल उभारण्याचा प्रयत्न
प्रक्रिया केंद्रांसाठी आवश्यक सुविधा, कार्यपद्धती, खासगी आणि सीएसआर सहभाग तसेच तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक उत्पादनांच्या प्रसाराबाबतही बैठकीत चर्चा झाली.
पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी निर्माल्य व्यवस्थापनाचे आदर्श आणि शाश्वत मॉडेल उभारण्याचा कुंभमेळा प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0