श्रीधर फडके यांच्या सुरांनी जिंकली कोल्हापूरकरांची मने

महागणेशोत्सवांतर्गत कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्रीधर फडके यांच्या सुगम संगीताच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अजरामर भावगीते, भक्तिगीते आणि प्रेमगीतांनी रंगली सुरेल मैफल.

Sep 25, 2026 - 04:28
 0  11
श्रीधर फडके यांच्या सुरांनी जिंकली कोल्हापूरकरांची मने
श्रीधर फडके, श्रीधर फडके कोल्हापूर, महागणेशोत्सव, कोल्हापूर संगीत कार्यक्रम, सुगम संगीत, सुधीर फडके, बाबूजी, शाहू स्मारक भवन, महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, कोल्हापूर सांस्कृतिक कार्यक्रम,

प्रतिनिधी: उमेश जाधव 

महागणेशोत्सवातील सुगम संगीताच्या मैफलीला रसिकांची भरभरून दाद; ‘वन्स मोअर’च्या गजरात रंगला संगीत सोहळा

कोल्हापूर, दि. 23 : ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या सुमधुर स्वरांनी कोल्हापूरकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन येथे आयोजित ‘महागणेशोत्सव’ अंतर्गत श्रीधर फडके यांच्या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देव्हारे’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था तुज नमो’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘आकाशी झेप घे रे पाखरा’, ‘तेजोमय नाद ब्रह्म हे’, ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘येवो विठ्ठले भक्तजन वत्सले’ अशा अजरामर भावगीते, भक्तिगीते आणि प्रेमगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह सुरांनी भारावून गेले.

सुरेल गीतांनी रंगली संगीत मैफल

कार्यक्रमाची सुरुवात ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या गीताने झाली. त्यानंतर ‘फुलले रे क्षण माझे’, ‘मन कशातच लागत नाही’, ‘आदी माया अंबाबाई’, ‘तुला पाहिले’, ‘नदीच्या किनारी’, ‘तू कधी वेणीस फूल खोवतेस ना’, ‘बाई मी विकत घेतला शाम’, ‘तूच चंद्रमा नभात’, ‘माता भवानी जगताची जननी’ यांसह विविध भावगीते, अभंग, भक्तिगीते, प्रेमगीते आणि लावण्यांनी रसिकांना संगीताच्या वेगळ्याच दुनियेत नेले.

पहिल्या गीतापासूनच कोल्हापूरकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत कलाकारांचा उत्साह वाढवला. जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे, सुरेश भट, ग्रेस यांच्यासह अनेक दिग्गज गीतकारांची गीते श्रीधर फडके यांनी सादर केली. गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि शेफाली साकोलीकर यांनीही सुरेल गायनाची साथ दिली.

वाद्यवृंदाची सुरेल साथ

वाद्यवृंदामध्ये तबल्यावर तुषार आग्रे, बासरीवर डॉ. सचिन जगताप, की-बोर्डवर सुनील गुरव आणि साइड रिदमवर अनिकेत ससाणे यांनी उत्तम साथसंगत केली. सुकन्या जोशी यांच्या प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.

‘आयुष्य आणि अध्यात्म यांना जोडणारा दुवा म्हणजे संगीत’ आणि ‘सुंदर गायन तिथे रंगले मन’ अशा निवेदनातील शब्दांनीही रसिकांची दाद मिळवली.

ध्वनीव्यवस्था संदीप चव्हाण, रंगमंच व्यवस्था मिलिंद अष्टेकर, तर सजावट सागर भोसले यांनी सांभाळली.

बाबूजींच्या कोल्हापूरशी असलेल्या नात्याच्या आठवणींना उजाळा

यावेळी श्रीधर फडके यांनी त्यांचे वडील आणि ज्येष्ठ स्वरसम्राट सुधीर फडके अर्थात ‘बाबूजी’ यांच्या कोल्हापूरशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला.

बाबूजींचा जन्म कोल्हापुरात झाला असून त्यांच्या सांगीतिक प्रवासाची पायाभरणीही याच भूमीत झाली असल्याचे श्रीधर फडके यांनी सांगितले. तसेच पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे बाबूजींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली.

‘ॐकार स्वरूपा’ला रसिकांची उत्स्फूर्त साथ

‘ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था तुज नमो’ हे गीत श्रीधर फडके यांच्यासोबत उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्तपणे गायले. संपूर्ण सभागृहाने एकसुरात साथ दिल्याने या क्षणाने मैफलीतील वातावरण अधिकच भक्तिमय झाले.

यावेळी कोल्हापूरकरांच्या गायनाचे कौतुक करत श्रीधर फडके यांनी, “कोल्हापूरकर उत्तम आणि सुरात गायले. मुंबईत गेल्यावर मी सर्वांना नक्की सांगेन. माझ्या गाववाल्यांनी भरभरून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद!” अशा शब्दांत रसिकांचे आभार मानले.

आसनव्यवस्था अपुरी; रसिकांनी उभे राहून अनुभवली मैफल

कार्यक्रमाला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सभागृहातील आसनव्यवस्था अपुरी पडल्याने अनेक रसिकांनी उभे राहून, तसेच स्टेजच्या बाजूला बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला. विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, गुणीदास फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता सप्रे, संस्थापक राजप्रसाद धर्माधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

महागणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या संगीत मैफलीनंतर उपस्थित रसिकांनी कार्यक्रमाला ‘नादखुळा’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत श्रीधर फडके यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. सुरेल गाणी, दमदार साथसंगत, बाबूजींच्या आठवणी आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही मैफल कोल्हापूरच्या सांस्कृतिक वातावरणात विशेष ठरली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.