दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धाराशिवच्या करजखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. पिण्याचे पाणी, पीक नुकसान, विमा, चारा व अन्नधान्यासाठी उपाययोजनांची ग्वाही.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
धाराशिव, दि. २३ सप्टेंबर : दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करताना राज्य सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. दुष्काळाशी लढताना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपलब्ध पाण्यात सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोरडा पडलेला साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
ऊस आणि सोयाबीनच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी बळी भोसले यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त ऊस आणि सोयाबीन पिकांची बारकाईने पाहणी केली.
पेरणी कधी केली, पिकाला किती पाऊस मिळाला, पावसाचा खंड किती काळ राहिला आणि त्याचा पिकांच्या वाढीवर तसेच संभाव्य उत्पादनावर काय परिणाम झाला, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.
सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून उसाची वाढही खुंटल्याचे पाहणीत निदर्शनास आले. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून येत असून शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांशी थेट संवाद
मुख्यमंत्री थेट बांधावर आल्याने परिसरातील शेतकरीही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे आले. पावसातील खंडामुळे झालेले नुकसान, उत्पादनातील संभाव्य घट, शेतीसाठी केलेली गुंतवणूक आणि त्याचा कुटुंबाच्या अर्थकारणावर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. अडचणीच्या काळात शेतकरी कुटुंबांना आवश्यक आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. मुलांचे शिक्षण बंद पडणार नाही, यासाठीही शासन संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या परिस्थितीत पिके वाचविणे अनेक ठिकाणी कठीण झाले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखून ठेवावे लागेल. पिण्याच्या पाण्याची गरज भागल्यानंतर पाणी उपलब्ध राहिल्यास त्याचा अन्य कारणांसाठी वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले.
पुढील चार-पाच महिने आव्हानात्मक
पुढील चार ते पाच महिने आव्हानात्मक असणार असून या काळात सर्वांनी एकमेकांना धीर देत आणि सहकार्य करत परिस्थितीतून मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर कार्यवाही करत आहे. पीक कर्जमाफीचे काम सुरू असून पीक कापणीचे प्रयोगही सुरू आहेत. पीक विम्याची मदत देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली जाईल. रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध असल्यास त्यादृष्टीनेही आवश्यक नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कर्जमाफी, वीजबिल माफी आणि थेट आर्थिक मदतीचे नियोजन
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आला असून, आता थेट आर्थिक मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शेतीचे उत्पन्न हातचे गेल्यामुळे शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पीक विमा, आर्थिक मदत आणि अन्नधान्य अशा सर्व पातळ्यांवर शासन नियोजन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे’
करजखेड्यातील पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संकट मोठे असल्याचे मान्य करत, एकजुटीने आणि परस्परांना धीर देत या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे आवाहन केले.
“दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही,” असा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पाहणी दौऱ्यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0