अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्याचाही कार्यक्रम पार पडला.

Jun 20, 2026 - 22:11
 0  1
अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २० (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्याचाही शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था

'महाराष्ट्राचे मँचेस्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून ओळखली जाते. बँकेची स्थापना ५ नोव्हेंबर १९६२ रोजी झाली असून ७ फेब्रुवारी १९६३ रोजी बँकेने प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.

महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये बँकेच्या एकूण ५५ शाखा कार्यरत असून मल्टी-स्टेट सहकारी बँकिंग क्षेत्रात बँकेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आर्थिक प्रगतीची उल्लेखनीय वाटचाल

कार्यक्रमात बोलताना बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा दिला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेच्या ५५ शाखांमार्फत ८५ हजार ८३५ सभासदांना सेवा देण्यात आली असून बँकेचे भांडवल ८१ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

बँकेकडे सुमारे २,९७५ कोटी रुपयांच्या ठेवी असून १,८९४ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जवाटप करण्यात आले आहे. स्वयंप्रकाश सोलर कर्ज, कृषी कर्ज, केंद्र शासनाची फूड प्रोसेसिंग योजना तसेच उद्योजकांसाठी विविध वित्तीय सुविधा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

आधुनिक बँकिंग सुविधांचा विस्तार

ग्राहकांना परकीय चलन विनिमय, लेटर ऑफ क्रेडिट, बँक गॅरंटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवा यांसारख्या आधुनिक सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती स्वप्निल आवाडे यांनी दिली. शासनाच्या विविध योजना आणि कर्जसुविधांद्वारे तरुणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्याचे कामही बँक करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0