गडचिरोलीत श्रमशक्ती व असंघटित उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ; नागरिकांनी अचूक माहिती देण्याचे आवाहन
‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेला गती देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला असून नागरिकांनी क्षेत्रीय पथकांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली प्रतिनिधी, दि. १५ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला बळ देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण (Labour Force Survey) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्तीचा सहभाग, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची स्थिती, उत्पन्नाचे स्रोत तसेच विविध सामाजिक आणि आर्थिक घटकांविषयीची अचूक व विश्वासार्ह माहिती संकलित केली जाणार आहे. ही माहिती राज्य आणि जिल्हास्तरीय विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना आवाहन केले की, सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय पथकांना योग्य सहकार्य करावे आणि अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी. या माहितीच्या आधारे जिल्ह्याच्या विकासाचे वास्तव चित्र समोर येणार असून भविष्यातील धोरणे आणि योजना अधिक परिणामकारकपणे आखता येतील.
राज्य शासनाने जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत प्रत्येक जिल्ह्याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणातून मिळणारी माहिती रोजगार निर्मिती, उद्योग विकास, कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा तसेच विकास आराखडे तयार करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगाराच्या संधी, उद्योजकतेची स्थिती आणि नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे.
राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत एकूण ६ हजार ८२८ नमुना घटकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी २७६ प्रशिक्षित अन्वेषक आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून ते घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. संकलित आकडेवारीचा उपयोग ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील विकास योजनांच्या आखणीसाठी केला जाणार आहे.
हे सर्वेक्षण आयपीएएसओएस रिसर्च, मुंबई या संस्थेमार्फत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता सत्य आणि अचूक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त ज्ञानेश्वर खडतकर यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0