उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली; प्रवेशोत्सवासह ‘नशामुक्त कोल्हापूर’ची शपथ

उन्हाळी सुट्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा नव्या उत्साहात सुरू झाल्या. प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी आणि विविध उपक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा दिली. यावेळी ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली.

Jun 15, 2026 - 21:57
 0  1
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली; प्रवेशोत्सवासह ‘नशामुक्त कोल्हापूर’ची शपथ
कोल्हापूर प्रवेशोत्सव, जिल्हा परिषद शाळा, नशामुक्त कोल्हापूर

कोल्हापूर, दि. 15 : उन्हाळी सुट्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांची घंटा पुन्हा एकदा नव्या उत्साहाने आणि जल्लोषात वाजली. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी, स्वागत मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यातील गावस्तरीय शाळा व्यवस्थापन समित्या, पालक, लोकप्रतिनिधी, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवेशोत्सवामुळे जिल्ह्यातील शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आणि आनंदी वातावरणाने फुलून गेला

.

भुदरगड तालुक्यातील नाधवडे विद्यामंदिर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रवेशोत्सवात सहभाग घेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चांगले आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी “सरकारी शाळा म्हणजे सर्वसामान्यांच्या हक्काचे ज्ञानमंदिर” असल्याचे सांगत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

करवीर तालुक्यातील वरणगे येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी नियमित शिक्षण, वाचन संस्कृती आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले.

दरम्यान, कसबा बावडा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसह शहरातील विविध दिव्यांग शाळांमध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिक्षण अधिकारी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे आणि शालेय जीवनाची सकारात्मक सुरुवात व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

यावर्षी प्रवेशोत्सवासोबतच जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’चीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याची तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची शपथ देण्यात आली. शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी, चांगले संस्कार आणि सकारात्मक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रवेशोत्सव, विद्यार्थ्यांचे स्वागत, शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि नशामुक्तीची शपथ अशा विविध उपक्रमांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0