सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा कोल्हापूरमध्ये पथदर्शी उपक्रम; 3 हजार शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

महिला व बालकांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार शाळांमध्ये विशेष सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर राज्यभर विस्तारला जाणार आहे.

Jun 8, 2026 - 20:27
 0  2
सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा कोल्हापूरमध्ये पथदर्शी उपक्रम; 3 हजार शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
सायबर सुरक्षा, महिला आयोग, कोल्हापूर, नंदिनी आवडे, सायबर गुन्हे,

कोल्हापूर | प्रतिनिधी

महिला व बालकांवरील वाढते सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि समाजमाध्यमांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 3 हजार शाळांमध्ये विशेष पथदर्शी सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर तो संपूर्ण राज्यात विस्तारण्याचा आयोगाचा मानस आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून त्याविषयी समाजात व्यापक जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, महिला व बालकांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे, ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, पोक्सो कायदा, माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा आणि इतर संबंधित कायदेशीर बाबींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच फेक प्रोफाइल, सायबर बुलिंग, ऑनलाइन छळ, सेक्सटॉर्शन, मॉर्फिंग, ओळख चोरी (आयडेंटिटी थेफ्ट) यांसारख्या गुन्ह्यांची माहिती देऊन त्यांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम समजावून सांगितले जाणार आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांबाबतही मार्गदर्शन केले जाईल.

हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. या मोहिमेत सायबर पोलीस अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी, मानसोपचारतज्ज्ञ, बाल संरक्षण तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सहभाग राहणार आहे. केस स्टडी, संवादात्मक सत्रे आणि गटचर्चांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यात येणार आहे.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, जिल्हा संरक्षण अधिकारी अलोक अग्रहारी, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, सायबर तज्ज्ञ, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याची सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात ‘मॉडेल जिल्हा’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महिला आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जात असून हा उपक्रम त्यादृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास सचिव नंदिनी आवडे यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0