उरीतील स्फोटात कोल्हापूरचा वीर सुपुत्र शहीद; विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर गोंडोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी अश्रुपूर्ण निरोप देत वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर जवानाच्या पार्थिवावर शुक्रवारी गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण गोंडोली येथील विद्यामंदिर शाळेत झाले होते. त्यानंतर त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. देशसेवेची प्रेरणा मनात बाळगत त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर येथे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले.
देशसेवेचा गौरवशाली प्रवास
विक्रम चव्हाण यांची 2018 मध्ये राजस्थानमधील सुरतगड येथे पहिली नियुक्ती झाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे त्यांनी सेवा बजावली. सध्या ते उरी येथे 8 राष्ट्रीय रायफल्स (RR) मध्ये कार्यरत होते. देशाच्या सीमांचे रक्षण करत असताना त्यांना वीरमरण आले.
‘विक्रम चव्हाण अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
शहीद जवानाचे पार्थिव गोंडोली येथे आणण्यात आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. ‘वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे’च्या घोषणांनी गाव आणि परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरपासून गोंडोलीपर्यंत अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत आपल्या वीर सुपुत्राला आदरांजली वाहिली.
पार्थिव काही काळ त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर लष्कर आणि पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून अंतिम सलामी दिली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करून राष्ट्राने आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.
हजारोंच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली
अंत्यसंस्कारावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, सभापती प्रियांका भोसले यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, सैन्यदलाचे अधिकारी, माजी सैनिक आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विक्रम चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावला गेला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांची मुलगी वीरा असा परिवार आहे.
अंत्यसंस्कारावेळी पत्नी आणि चिमुकल्या मुलीचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण परिसरातून या दुःखद घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असून, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानाला सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

