पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व जलसंवर्धनाचा संकल्प करावा – प्रवीण टाके

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, जलसंवर्धन आणि जैवविविधता जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले आहे.

Jun 4, 2026 - 19:44
 0  5
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व जलसंवर्धनाचा संकल्प करावा – प्रवीण टाके
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना उपसंचालक प्रवीण टाके.

कोल्हापूर, दि. ५ जून : पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारत वृक्षलागवड, जलसंवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय कार्यालय, कोल्हापूरचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी सांगितले की, राज्यभर विविध ठिकाणी रस्त्यांच्या रुंदीकरणासोबतच परिसराचे हरितीकरण आणि सामुदायिक वृक्षलागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. या उपक्रमांमुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास आणि हरित क्षेत्र वाढविण्यास मोठी मदत होत आहे.

ते म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाची खरी ताकद सामान्य नागरिकांमध्ये आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणात, गच्चीवर, शाळा-महाविद्यालय परिसरात किंवा सार्वजनिक जागांमध्ये स्थानिक वृक्ष, फुलझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करून छोट्या-छोट्या पर्यावरणीय व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होईल.

पावसाचे पाणी साठविणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, पाण्याची बचत करणे आणि स्थानिक जलस्रोतांचे जतन करणे ही पर्यावरण संरक्षणाची प्रभावी साधने असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘जल, जमीन आणि जंगल’ हे मानवी जीवनाचे तीन मूलभूत आधारस्तंभ असून त्यांचे संरक्षण करणे ही आजच्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे. आपण वापरत असलेली नैसर्गिक संपत्ती पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविणे हेच खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचे तत्त्व असल्याचे टाके यांनी सांगितले.

मान्सूनच्या आगमनानंतर वृक्षलागवडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्यसंख्येइतकी झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांच्याकडे स्वतःची जागा उपलब्ध नाही त्यांनी शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत परिसर, सार्वजनिक ठिकाणे किंवा शासनाच्या वृक्षलागवड मोहिमांमध्ये सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.

पर्यटनासाठी जाताना ‘सीडबॉल’ सोबत घेऊन जंगल परिसरात त्यांचा वापर केल्यास नैसर्गिक वृक्षसंवर्धनाला चालना मिळू शकते. मात्र केवळ वृक्षलागवड न करता त्या रोपांचे संगोपन आणि संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आज निसर्गाला मानवी हस्तक्षेपापासून अभय देण्याची गरज आहे. जलसाठ्यांचे संरक्षण, नदीपात्रांचे जतन, सांडपाणी व्यवस्थापन, जंगलांचे संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण, अक्षय ऊर्जा निर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांचा संयमी वापर या माध्यमातून पर्यावरण अधिक समृद्ध करता येईल, असे टाके यांनी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने ‘एक झाड, एक जलस्रोत आणि एक पर्यावरणपूरक सवय’ जपण्याचा संकल्प केल्यास हरित, समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठीचा मार्ग अधिक सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0