सीपीआरमध्ये २५० कोटींच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण; “आता प्रत्येक रुग्णाला जिल्ह्यातच उपचार” – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या आयसीयू, रोबोटिक फिजिओथेरपी लॅब, पल्मनरी लॅब आणि आधुनिक उपचार सुविधांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना आता जिल्ह्यातच दर्जेदार उपचार उपलब्ध होणार आहेत.

May 29, 2026 - 23:25
 0  3
सीपीआरमध्ये २५० कोटींच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण; “आता प्रत्येक रुग्णाला जिल्ह्यातच उपचार” – मंत्री हसन मुश्रीफ
सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर, हसन मुश्रीफ, आरोग्य सुविधा

कोल्हापूर, दि. २९ : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे सुमारे २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि सुविधांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या सुविधांमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांप्रमाणे आधुनिक उपचार सेवा जिल्ह्यातच उपलब्ध होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर होते. महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, “सीपीआर हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे आधारवड आहे. १९८५ मध्ये उभारलेल्या या इमारतीचा कायापालट करण्याचे भाग्य मला लाभले. आता प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळतील. एकही रुग्ण उपचारासाठी बाहेर जाणार नाही, अशा सुविधा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.”

सीपीआरमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधांमध्ये इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट (RICU), पल्मनरी लॅबोरेटरी, मेडिकल आयसीयू, सर्जिकल आयसीयू, रोबोटिक आर्मयुक्त फिजिओथेरपी लॅब, फार्माकोजेनोमिक लॅब तसेच अत्याधुनिक कान-नाक-घसा विभागाचा समावेश आहे.

आरआयसीयूमध्ये श्वसनविकारांच्या गंभीर रुग्णांसाठी १० बेड, व्हेंटिलेटर सुविधा आणि मल्टीपॅरा मॉनिटर उपलब्ध करण्यात आले आहेत. मेडिकल आयसीयूमध्ये ४० बेडची व्यवस्था असून सर्जिकल आयसीयूमध्ये अपघातग्रस्त आणि अत्यवस्थ रुग्णांसाठी १६ बेडची सुविधा उभारण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच शासकीय रुग्णालयात रोबोटिक आर्मद्वारे फिजिओथेरपी सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रोबोटिक गेट ट्रेनिंग सिस्टमसह आधुनिक थेरपी उपकरणे बसविण्यात आली आहेत.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “जिल्ह्यात दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणून त्यांनी आरोग्य सेवेचे मोठे जाळे उभे केले आहे.” महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्येक रुग्णाला कुटुंबातील सदस्य समजून सेवा देण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध सुविधांचे लोकार्पण करण्यात आले आणि मान्यवरांनी नव्या विभागांची पाहणी केली. कार्यक्रमास डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गट चारमधील नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरणही करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.