सौरऊर्जा प्रकल्पांमुळे महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या वीजबिलात ४७.७३ टक्क्यांची घट!

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील सौरऊर्जा प्रकल्पांमुळे आठ इमारतींच्या वीज वापरात १२,३८३ युनिट्सची बचत झाली असून, वीजबिलात ४७.७३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या वीजबिलात ४७.७३ टक्क्यांची घट!
BMC Solar Energy Project, G South Ward, Mumbai Municipal Corporation, Solar Power Savings, Electricity Bill Reduction, सौरऊर्जा प्रकल्प, मुंबई महापालिका, वीजबिल बचत

प्रतिनिधी : देवानंद शिंदे 

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या वीजबिलात ४७.७३ टक्क्यांची घट!

महापालिकेच्या आठ इमारतींमध्ये एका महिन्यात १२,३८३ युनिट्स विजेची बचत; पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराला चालना

मुंबई, दि. २५ नोव्हेंबर : ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागामार्फत विविध मालमत्तांमध्ये उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे वीज वापर आणि वीजबिलात लक्षणीय घट झाली आहे. महापालिकेच्या आठ विविध इमारतींमध्ये मे आणि जून २०२६ या दोन महिन्यांच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, वीज वापरात तब्बल १२ हजार ३८३ युनिट्सची बचत झाली असून, एकत्रित वीजबिलात सुमारे ४७.७३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

ऊर्जा खर्च कमी करण्यासोबतच पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व घटविणे आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी महानगरपालिकेच्या विविध सार्वजनिक मालमत्तांमध्ये १२ किलोवॅट क्षमतेचे ऑन-ग्रिड सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

आठ इमारतींच्या वीज वापरात १२,३८३ युनिट्सची बचत

महानगरपालिकेच्या आठ कार्यालयीन इमारतींमधील वीज वापराच्या आकडेवारीनुसार, मे २०२६ मध्ये एकत्रित वीज वापर २३ हजार ७०१ युनिट्स इतका होता. सौरऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर जून २०२६ मध्ये हा वापर ११ हजार ३१८ युनिट्सवर आला. त्यामुळे एका महिन्यात वीज वापरात १२ हजार ३८३ युनिट्सची घट नोंदविण्यात आली.

वीजबिलाच्या रकमेतही मोठी बचत झाली आहे. मे २०२६ मध्ये या आठ मालमत्तांचे एकत्रित वीजबिल २ लाख ३२ हजार ४६ रुपये होते. जून २०२६ मध्ये ते १ लाख २१ हजार २८८ रुपयांवर आले. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात वीजबिलात १ लाख १० हजार ७५८ रुपयांची बचत झाली असून, ही घट सुमारे ४७.७३ टक्के आहे.

वरळी स्मशानभूमी, शाळा आणि कार्यालयीन इमारतींमध्ये सौरऊर्जा

महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वरळी स्मशानभूमी तसेच महानगरपालिकेच्या विविध शाळा आणि अन्य कार्यालयीन इमारतींमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून सार्वजनिक मालमत्तांमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे महापालिकेच्या पायाभूत सुविधांची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन वीज खर्चात बचत, स्वच्छ ऊर्जेचा वापर आणि पारंपरिक वीज निर्मितीमुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या दृष्टीनेही हे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत.

अन्य मालमत्तांमध्येही सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार

महानगरपालिकेच्या सार्वजनिक मालमत्तांमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे, ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देणे आणि सार्वजनिक निधीचा अधिक कार्यक्षम वापर करणे या उद्दिष्टांसाठी जी दक्षिण विभागामार्फत असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे होणाऱ्या वीज बचतीचे नियमित निरीक्षण करण्यात येणार असून, त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे महानगरपालिकेच्या अन्य मालमत्तांमध्येही अशा प्रकल्पांची उभारणी करण्याच्या संधींचा शोध घेतला जाणार आहे.

याबाबत परिमंडळ २ चे उप आयुक्त प्रशांत सपकाळे आणि जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी माहिती दिली. महापालिकेच्या विविध मालमत्तांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढविण्याच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.