कोल्हापुरात संविधान दिन उत्साहात साजरा; बिंदू चौकात संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन, विद्यार्थ्यांची समता रॅली
कोल्हापुरात संविधान दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन आणि समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.
प्रतिनिधी: उमेश जाधव
खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संविधान प्रस्ताविकेचे वाचन; आंबेडकर, फुले आणि राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : भारतीय संविधान दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन आणि समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐतिहासिक बिंदू चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संविधानातील मूल्यांचा प्रत्येकाने अंगीकार करावा – खासदार धनंजय महाडिक
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करणारा हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. संविधानाने देशाला संघराज्य शासनव्यवस्था, मूलभूत अधिकार, कायद्यासमोर समानता, धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण तरतुदी दिल्या आहेत.
भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये नमूद केलेल्या मूलभूत मूल्यांची प्रत्येक नागरिकाने माहिती करून घ्यावी. केवळ संविधानाचे वाचन न करता त्यातील विचार आणि मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर खासदार महाडिक यांनी उपस्थितांसमवेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
विद्यार्थ्यांच्या सहभागातून समता रॅली
संविधान दिनानिमित्त आयोजित समता रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ऐतिहासिक बिंदू चौक येथून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर गंगाराम कांबळे स्मारक आणि सी.पी.आर. मार्गे दसरा चौक येथे रॅली दाखल झाली. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीच्या माध्यमातून संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
विद्यार्थ्यांना संविधान पुस्तिकांचे वाटप
कार्यक्रमाच्या प्रारंभी एस. के. डिगे फाऊंडेशनच्या वतीने उपस्थित शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, संविधानातील अधिकार आणि कर्तव्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी अक्षय कुरणे, समाजकल्याण अधिकारी, कविता गायकवाड (लेखाधिकारी) यांच्यासह जिल्ह्यातील संविधानप्रेमी नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी, तालुका समन्वयक आणि समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परब यांनी केले, तर सचिन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संविधान दिनानिमित्त आयोजित सामूहिक वाचन, समता रॅली आणि संविधान पुस्तिका वाटप या उपक्रमांमधून कोल्हापुरात संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे सामाजिक समता, लोकशाही आणि संविधानाविषयी जनजागृती करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला
.