दुष्काळी परिस्थितीत ऊस शेतीत ५० टक्क्यांपर्यंत पाणी बचत शक्य; ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन’ पद्धतीचा अवलंब करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर जिल्ह्यात कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांनी खोडवा उसात पाचट न जाळता एक आड एक सरीत आच्छादन व कडधान्य आंतरपीक घ्यावे. यामुळे पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. ७ (जिमाका) : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ सुमारे ५० टक्के पाऊस झाल्याने काही भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खोडवा व निडवा उसामध्ये पाचट न जाळता ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन आणि रिकाम्या सरीत कडधान्याचे आंतरपीक’ ही शास्त्रीय पद्धत अवलंबावी. यामुळे पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. त्यापैकी जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर खोडवा ऊस घेतला जातो. ऊसतोडणीनंतर शेतात मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणाऱ्या पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास कोणतीही अतिरिक्त आर्थिक गुंतवणूक न करता पाणी बचतीबरोबरच जमिनीची सुपीकताही वाढवता येते.
एक आड एक सरीत पाचट आच्छादन; मोकळ्या सरीत पाणी द्या
ऊसतोडणीनंतर शेतात हेक्टरी सुमारे १० ते १२ टन पाचट शिल्लक राहते. हे पाचट जाळण्याऐवजी एका सरीत व्यवस्थित दाबून रचावे आणि त्याच्या शेजारील एक सरी पूर्णपणे मोकळी ठेवावी. अशा प्रकारे शेतातील सुमारे ५० टक्के क्षेत्र पाचटाने आच्छादित राहते.
पाणी देताना पाचट असलेल्या सरीत पाणी न सोडता केवळ मोकळ्या सरीत पाणी द्यावे. केशाकर्षण प्रक्रियेमुळे मोकळ्या सरीतील ओलावा शेजारील पाचट आच्छादित सरीतील जमिनीत पोहोचतो. त्यामुळे कमी पाण्यात पिकाला आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होते.
रिकाम्या सरीत मूग, उडीद, चवळीचे आंतरपीक घ्या
मोकळ्या सरीत वैशाखी मूग, उडीद किंवा चवळी यांसारख्या कडधान्यांची पेरणी करता येते. काढणीच्या वेळी केवळ शेंगा तोडून पिकांचे अवशेष त्याच सरीत आच्छादन म्हणून कुजवावेत किंवा जनावरांच्या वैरणीसाठी वापरावेत.
पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने मका, युतीफीड आणि रब्बी ज्वारी यांसारखी चारा पिके घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. यामुळे ऊस पिकासोबतच कडधान्य आणि चारा उत्पादनाचा अतिरिक्त लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो.
पाचट व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण फायदे
‘एक आड एक सरी’ पद्धतीने पाणी दिल्यास हेक्टरी सुमारे एक कोटी लिटर पाण्याची बचत होऊ शकते. पाचट आच्छादनामुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि जमिनीत १२ ते १५ दिवसांपर्यंत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
पाचट कुजल्यानंतर हेक्टरी पाच ते सहा टन उच्च दर्जाचे सेंद्रिय खत विनाखर्च उपलब्ध होते. त्यातून जमिनीला हेक्टरी सुमारे ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद आणि ७५ ते १०० किलो पालाश यांसारखी अन्नद्रव्ये मिळतात.
रिकाम्या सरीत कडधान्याचे आंतरपीक घेतल्यास हेक्टरी सुमारे २.५ ते ३ क्विंटल उत्पादन मिळू शकते. त्यामुळे घरगुती गरजा भागवण्यासोबतच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो.
पाचट आच्छादनामुळे तणांची वाढ कमी होत असल्याने निंदणी, खुरपणी आणि बगला फोडण्याच्या खर्चात एकरी दोन ते तीन हजार रुपयांची बचत होऊ शकते. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, गांडुळांची संख्या वाढण्यास मदत होते आणि उसाच्या उत्पादनात हेक्टरी किमान १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असते. या पद्धतीमुळे सलग तीन ते चार वर्षे दर्जेदार खोडवा पीक घेणेही शक्य होते.
पाचट जाळल्याने जमिनीचे आणि पर्यावरणाचे नुकसान
शेतातील पाचट जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन आणि धूर वातावरणात पसरतो. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. तसेच आगीच्या तीव्र उष्णतेमुळे जमिनीतील गांडुळे, मित्रकीटक आणि उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन जमीन कडक आणि कमी सुपीक होण्याचा धोका निर्माण होतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट जाळण्याऐवजी त्याचे योग्य आच्छादन करून जमिनीची सुपीकता टिकवण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाचट लवकर कुजण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर करा
पाचटाचे लवकर विघटन होण्यासाठी तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी ट्रायकोडर्मा, ॲसिटोबॅक्टर आणि पीएसबी यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर करावा, असे कृषीविषयक मार्गदर्शन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, शेतकरी गट आणि ग्रामपंचायतींनी पाचट न जाळण्याबाबत व्यापक जनजागृती करावी. शेतकऱ्यांनी या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यासाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन, जमिनीची सुपीकता आणि अतिरिक्त उत्पन्न या तिन्ही बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे, हा या आवाहनाचा मुख्य उद्देश आहे.