कोल्हापूर पोलीस दलाचे तंबाखूमुक्तीसाठी पाऊल; कोटपा कायद्याबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

तंबाखूमुक्त युवा अभियान ४.० अंतर्गत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांना कोटपा २००३ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष क्षमता बांधणी प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

कोल्हापूर पोलीस दलाचे तंबाखूमुक्तीसाठी पाऊल; कोटपा कायद्याबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
कोल्हापूर पोलीस, तंबाखूमुक्त युवा अभियान ४.०, कोटपा कायदा २००३, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, तंबाखूमुक्त कोल्हापूर, पोलीस प्रशिक्षण, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल

प्रतिनिधी : उमेश जाधव 

तंबाखूमुक्त युवा अभियान ४.० अंतर्गत विशेष क्षमता बांधणी प्रशिक्षण; सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील तंबाखू विक्रीवर कारवाईचे मार्गदर्शन

कोल्हापूर, दि. २ (जिमाका) : युवकांमधील तंबाखू सेवनाला प्रतिबंध करणे, तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, या उद्देशाने देशभरात ‘तंबाखूमुक्त युवा अभियान ४.०’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला असून ‘कोटपा २००३’ कायद्याबाबत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हे ६० दिवसीय देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

पोलीस मुख्यालयात विशेष प्रशिक्षणाचे आयोजन

कोल्हापूर जिल्ह्यात तंबाखूमुक्तीच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत पोलीस विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणात ‘कोटपा २००३’ अर्थात सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायद्याच्या तरतुदी, त्याची अंमलबजावणी आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध करावयाची कारवाई याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

प्रशिक्षणाच्या प्रारंभी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे (NTCP) जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या तंबाखूमुक्ती मोहिमेचा आढावा घेतला. पोलीस विभागासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यामागील उद्देश, तंबाखूमुक्त युवा अभियान ४.० ची पार्श्वभूमी आणि या मोहिमेत पोलीस प्रशासनाचे योगदान याविषयी त्यांनी माहिती दिली.

कोटपा कायद्याच्या कलमांबाबत तांत्रिक मार्गदर्शन

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी अनिल गुंजे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कोटपा २००३ कायद्यातील विविध कलमे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास असलेली बंदी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर असलेले निर्बंध आणि कायद्याचे उल्लंघन झाल्यास करावयाची कारवाई या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कोणती कार्यपद्धती अवलंबावी, याबाबतही तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

तंबाखूमुक्त कोल्हापूरसाठी पोलीस आणि आरोग्य विभाग कटिबद्ध

तंबाखूमुक्त युवा अभियान ४.० यशस्वी करण्यासाठी तसेच कोल्हापूर जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे या प्रशिक्षणाच्या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले.

या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) प्रमुख, पोलीस निरीक्षक (PI), सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

स्रोत : जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर