वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको; शेतकरी प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. खत, बियाणे, डिझेल, पिकविमा, पाणीटंचाई आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या मुद्द्यांवर आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.
हिंगोली प्रतिनिधी : भगवानराव मस्के
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी आणि नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले.
DAP खताचा तुटवडा, बियाण्यांची कमतरता, ट्रॅक्टरसाठी डिझेलचा अभाव, कालव्यामध्ये पाणी न सोडणे, बँकांमध्ये रोख रकमेची कमतरता, गॅस तुटवडा तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर वारंगा फाटा येथे आंदोलनकर्त्यांनी शासन आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन छेडले. हे आंदोलन जवळपास दोन तास सुरू होते.
आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनादरम्यान काही वेळ आंदोलनकर्ते आणि पोलिस प्रशासनामध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मागण्यांबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या :
शेतकऱ्यांना तात्काळ DAP खत आणि बियाणे उपलब्ध करावेत.
ट्रॅक्टरसाठी पेट्रोल पंपांवर पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध करून द्यावे.
पिक विमा दावे तातडीने मंजूर करावेत.
हळदीसह सर्व शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा.
बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करावी.
कालव्यांमध्ये तात्काळ पाणी सोडण्यात यावे.
बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती करावी.
गॅस एजन्सींवरील तुटवडा दूर करावा.
आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात आला नाही तर आगामी काळात मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना पोलिस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. मात्र, आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सेनगाव तालुका अध्यक्ष प्रवीण मते, कळमनुरी तालुका अध्यक्ष चैतन्य चव्हाण, राम चव्हाण, रमेश जाधव, गजानन काळे, शांतीराम सावके, ज्ञानेश्वर बोंढारे, सुभाषराव गाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक आणि नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1
