श्रीरामाच्या जयघोषात सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीचा शुभारंभ; ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न
नाशिक येथील पवित्र रामकुंडावर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने तयारीचा शुभारंभ झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी 12 कोटींहून अधिक भाविकांच्या स्वागतासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
नाशिक प्रतिनिधी | सुनेत्रा महाजन
नाशिक, दि. 10 : पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीचा शुभारंभ आज पवित्र रामकुंड येथे ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात पार पडलेल्या या सोहळ्याला साधू-संत, महंत, विविध आखाड्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघ, नाशिक यांच्या वतीने कमला एकादशीच्या पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून 12 कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, सामाजिक व धार्मिक संस्था तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, भाविकांच्या स्वागतासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक म्हणून पुढाकार घ्यावा. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संस्था आणि नागरिकांकडून सुरू असलेले प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
35 हजार कोटींच्या विकासकामांना वेग
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्हाभरात रस्ते, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांशी संबंधित सुमारे 35 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
या विकासकामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी साधू-संत, आखाडे, प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, माजी आमदार बाळासाहेब सानप तसेच पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू-संत आणि महंत उपस्थित होते.
यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज आणि संजयदत्त महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.
भक्तीमय वातावरणात सोहळा
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विधीवत गंगा-गोदावरी पूजन करण्यात आले. शंखनाद, वेद मंत्रोच्चार आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. विविध आखाड्यांचे संत-महंत, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1