सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडा; २७ गावांच्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

औंढा नागनाथ तालुक्यातील केळी पाझर तलावात सिद्धेश्वर धरणाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी २७ गावांतील शेतकऱ्यांनी गोळेगाव कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. हिंगोली पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

May 12, 2026 - 03:57
 0  71
सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडा; २७ गावांच्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
सिद्धेश्वर धरण, केळी पाझर तलाव, जलसमाधी आंदोलन, हिंगोली

हिंगोली प्रतिनिधी : भगवानराव मस्के

औंढा नागनाथ तालुक्यातील केळी पाझर तलावात सिद्धेश्वर धरणाचे पाणी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता शेकडो शेतकऱ्यांनी गोळेगाव कालव्यात उतरून लक्षवेधी जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर हिंगोली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून केळी पाझर तलावासाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडावे, यासाठी २७ गावांतील शेतकरी शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. अनेक वेळा निवेदने देऊनही शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या मते, सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होत असून शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे तातडीने सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात घेऊन हिंगोली पाटबंधारे विभागाचे अभियंता पत्की यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्याही आंदोलनस्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

या आंदोलनात एकनाथ नागरे, गंगाधर घुगे, बालाजी सांगळे, सचिन आघाव, संतोष मोरगे, अमोल सांगळे, विठ्ठल सांगळे, राजेश सांगळे, रानोजी घुगे, भास्कर आघाव, प्रल्हाद गिते, गजानन कुटे, निवास सांगळे पाटील, निवास घुगे, सोपान आघाव, शुभम सांगळे, शिवाजी भोपे, संतोष नागरे, विष्णू सांगळे, परमेश्वर सांगळे, परमेश्वर दराडे, बालाजी नागरे, बाळासाहेब सानप, अमोल गीते, महादेव दराडे, बालाजी गीते, गणेश मुंडे, गोविंद सांगळे, ज्ञानेश्वर मुंडे, खंडोजी दराडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 1