विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकसित भारत 2047’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी आणि राजनैतिक प्रतिनिधी हे महत्त्वाचे भागीदार असल्याचे सांगत विविध क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

Jun 17, 2026 - 22:27
 0  3
विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
जिष्णु देव वर्मा, राज्यपाल महाराष्ट्र,

मुंबई प्रतिनिधी : संदीप गिरकर, दि. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली असून ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी आणि राजनैतिक प्रतिनिधी हे महत्त्वाचे भागीदार ठरत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठी महावाणिज्यदूतांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

बॉम्बे जिमखाना येथे गेट वे हाऊस संस्थेतर्फे आयोजित विविध देशांच्या महावाणिज्यदूतांच्या वार्षिक बैठकीत राज्यपाल बोलत होते. यावेळी त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत विविध देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत जागतिक एकात्मतेचे दर्शन घडत असल्याचे सांगितले.

राज्यपाल म्हणाले की, मुंबईतील कॉन्सुलर समुदाय आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, व्हिसा सुविधा आणि लोकसंपर्क वाढविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

मुंबई हे दीर्घकाळापासून जागतिक स्तरावरील महत्त्वाचे शहर राहिले असून महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य, नवोपक्रम आणि उद्योजकतेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून उदयास आल्यामुळे अनेक देशांनी महाराष्ट्रात आपली राजनैतिक आणि व्यापारी कार्यालये स्थापन केली आहेत, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राने भारताच्या जागतिक संवादासाठी नेहमीच प्रवेशद्वाराची भूमिका बजावली आहे. विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, मंत्री, राजदूत आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या भेटींमुळे आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना मिळाल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राजनैतिक संबंधांमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे नमूद करत राज्यपालांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने राजनैतिक समुदायाशी संवाद सुलभ करण्यासाठी तसेच व्यापार व गुंतवणूक प्रोत्साहनासाठी स्वतंत्र राजशिष्टाचार विभाग स्थापन केला आहे. यामुळे जागतिक भागीदारीसाठी अधिक पोषक वातावरण निर्माण होईल आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्र अधिक स्वागतशील व प्रतिसादक्षम राज्य म्हणून अनुभवास येईल.

विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यपालांनी जागतिक शैक्षणिक सहकार्याला विशेष प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली. विविध देशांतील विद्यार्थी, संशोधक आणि विद्वानांनी महाराष्ट्रातील उच्च शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान संस्था जागतिक दर्जाच्या शिक्षण व संशोधनासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेवर प्रकाश टाकताना राज्यपालांनी इतिहास, संस्कृती, अध्यात्म, निसर्ग आणि आधुनिक विकास यांचा अद्वितीय संगम असलेल्या राज्यातील पर्यटनस्थळांना जागतिक पातळीवर अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन विविध देशांच्या प्रतिनिधींना केले.

व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, पर्यटन, नवोपक्रम, संस्कृती आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि जगातील विविध देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गेट वे हाऊसच्या कार्यकारी संचालक मनजित क्रिपलानी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. एझेडबीचे सहसंस्थापक बहराम वकील यांनी राज्यपालांचे आभार मानले.

स्त्रोत :

राज्यपाल सचिवालय, महाराष्ट्र राज्य.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0