संत गाडगे महाराजांच्या पुतळ्यासमोर अतिक्रमणाचा विळखा; श्री मंदिर परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरातील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात संत गाडगे महाराजांच्या पुतळ्यासमोर अतिक्रमण आणि अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या पालखी मार्गावरही अतिक्रमण आणि घाणीमुळे भाविक व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बुलढाणा प्रतिनिधी महेंद्र मिश्रा
बुलढाणा : "गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला" हे शब्द कानावर पडताच स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची आठवण होते. हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या संत गाडगे महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज असताना, विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत मात्र त्यांच्या पुतळ्यासमोरच अस्वच्छता आणि अतिक्रमणाचे चित्र दिसून येत आहे.
श्री गजानन महाराज मंदिर परिसरात संत गाडगे महाराजांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सौंदर्यीकरण प्रकल्पाभोवती सध्या अतिक्रमणाचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. पुतळ्यासमोरील परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेच्या दाव्यांना हरताळ फासला जात असल्याची भावना भाविक आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शहराच्या विकास आराखड्यानुसार कोट्यवधी रुपये खर्च करून पालखी मार्ग (आरडी-18) विकसित करण्यात आला. मात्र या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि अस्वच्छता दिसून येत असल्याने विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिर परिसरात दररोज हजारो भाविक येत असताना स्वच्छता आणि वाहतुकीच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला. मात्र त्यांच्या पुतळ्यासमोरील परिसराची झालेली अवस्था पाहता प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0