शेगाव कचोरी सेंटरवर छापा की नियमित तपासणी? अफवांमागचं खरं सत्य समोर

शेगावच्या प्रसिद्ध तिरथराम कचोरी सेंटरवर अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने छापा टाकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असताना, प्रत्यक्षात विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणीचा भाग म्हणून खाद्यपदार्थांचे नमुने घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी कचोरी सेंटरला भेट दिली.

Jun 12, 2026 - 21:59
 0  281
शेगाव कचोरी सेंटरवर छापा की नियमित तपासणी? अफवांमागचं खरं सत्य समोर
शेगाव कचोरी, तिरथराम कचोरी सेंटर, अन्न व भेसळ विभाग, शेगाव

महेंद्र मिश्रा, बुलढाणा प्रतिनिधी 

शेगाव, बुलढाणा : शेगाव आणि कचोरी हे समीकरण महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे. शेगावची कचोरी ही केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही लोकप्रिय असून तिची विशेष ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी 'शेगाव कचोरी' या नावाने दुकाने चालविली जातात.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शेगावमधील प्रसिद्ध तिरथराम कचोरी सेंटर चर्चेत आले आहे. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर सोशल मीडियावर आणि परिसरात विविध चर्चांना उधाण आले. "कचोरी सेंटरवर छापा पडला", "कचोरीमध्ये भेसळ आढळली", "अन्नाची गुणवत्ता संशयास्पद आहे" अशा अनेक अफवा पसरू लागल्या.

या चर्चांची सत्यता पडताळण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी थेट तिरथराम कचोरी सेंटरला भेट देऊन मालकाशी संवाद साधला. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी मोहिमेचा भाग म्हणून कचोरी बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे नमुने घेतले होते.

केंद्राच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, ही कारवाई कोणत्याही तक्रारीमुळे किंवा छाप्याच्या स्वरूपातील नव्हती. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार वेळोवेळी अशा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून अधिकाऱ्यांनी नमुने संकलित केले.

दरम्यान, अधिकृत अहवाल येण्यापूर्वी कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. शेगावच्या कचोरीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अनेक वर्षांपासून कायम असून ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेच्या दृष्टीने शासनाच्या विविध विभागांकडून नियमित तपासण्या केल्या जात असतात. त्यामुळे अशा तपासणीला "छापा" असे स्वरूप देऊन चुकीची माहिती पसरवणे टाळावे, असेही स्थानिक स्तरावरून सांगण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1