शेगावात प्रतिबंधित गुटखा-तंबाखूने भरलेला कंटेनर पकडला; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ७० लाखांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शेगाव येथे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांनी भरलेला कंटेनर पकडून ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालकासह संबंधित कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
बुलढाणा प्रतिनिधी : महेंद्र मिश्रा
शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांनी भरलेला कंटेनर पकडला आहे. या कारवाईत वाहनासह एकूण ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुटखा माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई १३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता शेगाव-वरवट रोडवरील यादव बेकरीसमोर करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गुलाबसिंग किंता वसावे हे पोलीस पथकासह अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना संशयित कंटेनरची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अशोक लेलँड मालवाहू वाहन क्रमांक एमएच-४०-जीटी-२९६५ मधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या वाहनाचा चालक सुरुर अहमद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) याच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच मालवाहू वाहन असा एकूण ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त वाहनाची अंदाजे किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गुलाबसिंग किंता वसावे यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चालक सुरुर अहमद नूर अहमद तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे असलेल्या M/S Shree Siddheshwar Tobacco Products Pvt. Ltd. या कंपनीचे मालक, भागीदार व संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव, शेगाव शहर पोलीस ठाणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, बुलढाणा व खामगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0