शेगावातील दगडफेक प्रकरणानंतर ‘योगी पॅटर्न’ची चर्चा; आरोपींवर बुलडोझर कारवाईची नागरिकांकडून मागणी
संतनगरी शेगावमध्ये दोन गटांतील वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्यानंतर १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घरात घुसून मारहाण, दगडफेक आणि धमकी दिल्याच्या आरोपांमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून काही जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील ‘बुलडोझर पॅटर्न’प्रमाणे कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महेंद्र मिश्रा : बुलढाणा प्रतिनिधी
शेगाव, दि. १५ : संतनगरी शेगावमध्ये पशुकत्तलीच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेक आणि मारहाणीत झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १९ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये उत्तर प्रदेशातील ‘योगी पॅटर्न’ अर्थात कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनी आरोपींवर बुलडोझर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. मात्र अशा कोणत्याही कारवाईबाबत प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद शेगाव शहरातील पेठ मोहल्ला परिसरात घडला. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.
पहिल्या प्रकरणात शेख मजिद शेख इसाक (वय ३२, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० जून रोजी १४ ते १५ जणांनी संगनमत करून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि दगडाने डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या भावालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घरासमोर दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात सैयद जमीर सैयद सैलानी (वय ५०, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आठ ते दहा जणांनी त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ केली. त्यानंतर घरासमोर दगडफेक करण्यात आली. यावेळी एका व्यक्तीने विट फेकल्यामुळे त्यांच्या डोळ्याखाली दुखापत झाली, तर त्यांच्या पुतण्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
दोन्ही तक्रारींवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिस प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेनंतर सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत असून, आरोपी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0