जळगाव जामोदमध्ये वनविभागाची धडक कारवाई; ४.७९ लाखांचा अवैध नीम लाकूड साठा जप्त
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात वनविभागाने मोठी कारवाई करत तब्बल ३६८ नग अवैध नीम (कडुलिंब) लाकूड जप्त केले. अंदाजे ४.७९ लाख रुपये किमतीच्या या साठ्याप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सॉ मिल्सचीही कसून तपासणी करण्यात आली.
बुलढाणा | प्रतिनिधी महेंद्र मिश्रा
दि. १८ मे २०२६
जळगाव जामोद ते संग्रामपूर रोडवरील चांगोफळ परिसरात वनविभागाने मोठी धडक कारवाई करत अवैधरीत्या साठवून ठेवलेले लाखो रुपयांचे लाकूड जप्त केले आहे. या कारवाईत विनापरवाना ठेवलेले तब्बल ३६८ नग नीम (कडुलिंब) प्रजातीचे लाकूड हस्तगत करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ४ लाख ७९ हजार ५०० रुपये असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने १४ मे २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता आणि १७ मे २०२६ रोजी दुपारी १२:३२ वाजता चांगोफळ परिसरात छापेमारी केली. या पाहणीदरम्यान विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला कडुलिंब लाकडाचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर वनविभागाने तातडीने पंचनामा करून वनगुन्हा दाखल केला.
याच कारवाईदरम्यान खाटूश्याम सॉ मिल, न्यू सातपुडा सॉ मिल आणि जामोद परिसरातील इतर ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान खाटूश्याम सॉ मिलच्या बाहेरील एका खाजगी जागेत मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. या ठिकाणाहून सुमारे ५० घनमीटर म्हणजेच ३६८ नग लाकूड जप्त करण्यात आले.
ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनपाल एस. एस. सावळे तसेच मोबाईल स्क्वॉड खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश राऊत आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय वनरक्षक जी. एस. साकळे, कुशोड, कडवकर, गव्हाणे, साळवे आणि प्रणव हागुणे यांनीही कारवाई यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, अवैध लाकूड वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉ मिल्सची टप्प्याटप्प्याने तपासणी करण्यात येणार आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे बनले असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि अवैध लाकूड साठा सुरू असताना संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाले का? तसेच या प्रकरणामागे कोणाचा आशीर्वाद होता का? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

