भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर; अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि स्थिर राजकीय परिस्थितीचा अंदाज
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे साडेतीनशे वर्षांच्या परंपरेनुसार घटमांडणीचे भाकीत जाहीर झाले असून, यंदा अतिवृष्टी, काही पिकांचे नुकसान, तसेच राजकीय परिस्थिती स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बुलढाणा/प्रतिनिधी –महेंद्र मिश्रा
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आणि सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या भेंडवळ (ता. जळगाव जामोद) येथील घटमांडणीचे वार्षिक भाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आले. या पारंपरिक भाकितानुसार यंदाच्या वर्षात सुरुवातीला पावसाचे प्रमाण जास्त राहणार असून काही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही पिके चांगली येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील, मात्र अतिवृष्टीमुळे शेतीला फटका बसू शकतो, असेही सांगण्यात आले. देशाच्या पातळीवर नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याचा अंदाजही या भाकितात व्यक्त करण्यात आला आहे. राजकीय परिस्थितीमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही आणि सत्ताधारी कायम राहतील, असेही या भाकितात नमूद करण्यात आले आहे.
भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला दरवर्षी शेतामध्ये एक खड्डा खोदून त्यात मातीचे मडके ठेवले जाते. त्यामध्ये पाणी व विविध पदार्थ ठेवले जातात. तसेच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य मांडले जाते. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या सर्व घटकांचे निरीक्षण करून वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते.
या परंपरेला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी शेतकरी मोठ्या संख्येने या भाकितावर विश्वास ठेवून पीक पेरणीचे नियोजन करतात. तसेच हे भाकीत ऐकण्यासाठीही दरवर्षी मोठी गर्दी होते.
साडेतीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज यांनी या घटमांडणीच्या परंपरेला सुरुवात केली होती. आजही त्यांच्या वंशजांकडून ही परंपरा जतन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0