भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर; देशाची संरक्षण स्थिती तणावात, अर्थव्यवस्था कमकुवत तर ‘राजा कायम’ राहणार

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक घटमांडणीद्वारे यंदाच्या वर्षाचे भाकीत जाहीर करण्यात आले असून देशाची संरक्षण स्थिती तणावात, अर्थव्यवस्था कमकुवत राहणार तर पंतप्रधान पदावर कायम राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Apr 20, 2026 - 14:55
 0  4
भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर; देशाची संरक्षण स्थिती तणावात, अर्थव्यवस्था कमकुवत तर ‘राजा कायम’ राहणार
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक घटमांडणीद्वारे यंदाच्या वर्षाचे भाकीत जाहीर करण्यात आले असून देशाची संरक्षण स्थिती तणावात, अर्थव्यवस्था कमकुवत राहणार तर पंतप्रधान पदावर कायम राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भब्यूरो- अमोल सराफ

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे सुमारे ३५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी ५:३० वाजता पार पडली. पूर्णा नदीकाठी होणाऱ्या या पारंपरिक विधीतून दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक, पावसाचे प्रमाण, सामाजिक-राजकीय घडामोडी तसेच नैसर्गिक आपत्तींचे भाकीत वर्तवण्यात आले.

यंदाच्या घटमांडणीच्या निष्कर्षानुसार देशाची संरक्षण स्थिती तणावपूर्ण राहणार असून संरक्षण खात्यावर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशाचा ‘राजा’ म्हणजेच पंतप्रधान आपल्या पदावर कायम राहतील, मात्र त्यांच्यावर तणाव राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नसल्याचेही या भाकितात नमूद करण्यात आले आहे.

शेती संदर्भात बोलायचे झाल्यास, यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी ही पिके भरपूर येतील व त्यांना चांगला बाजारभाव मिळेल, असे भाकीत आहे. तर ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील, असेही सांगण्यात आले.

पावसाच्या बाबतीत जून महिन्यात भरपूर पाऊस, जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही भागात महापुरामुळे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

भेंडवळ येथील ही घटमांडणी साडेतीनशे वर्षांपासून सुरू असून, अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला शेतात खड्डा खोदून त्यामध्ये मातीचे मडके, पाणी व विविध पदार्थ ठेवले जातात. त्याच्या आजूबाजूला विविध धान्य मांडले जाते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी निरीक्षण करून वर्षभराचे भाकीत जाहीर केले जाते.

या परंपरेला शास्त्रीय आधार नसला तरी शेतकरी मोठ्या विश्वासाने या भाकितानुसार आपल्या पिकांचे नियोजन करतात. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक घडामोडींच्या संदर्भात यंदाच्या भाकिताकडे विशेष लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0