पोरज येथील महिला शेतकरी गटाचा अभिनव उपक्रम; एक हजार लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पोरज येथे महिला शेतकरी गटाने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक हजार लिटर दशपर्णी अर्क तयार केला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेती शाळेत कपाशी लागवड, बियाणे निवड, हवामान बदल आणि कीड नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बुलढाणा | विदर्भ ब्युरो अमोल सराफ
खामगाव तालुक्यातील पोरज येथे महिला शेतकरी गटाने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक हजार लिटर दशपर्णी अर्क तयार करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम राबविला आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना कपाशी पिकाची निवड, लागवड पद्धती तसेच विविध कृषी तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये कपाशी लागवडीतील योग्य अंतर, बियाण्यांची निवड, “एक गाव एक वाण” या संकल्पनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच हवामान बदल आणि अल निनोच्या परिणामांबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
पिकावर कीड येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रासायनिक कीटकनाशकांवरील हजारो रुपयांचा खर्च कमी करण्यासाठी महिला शेतकरी गटाने दशपर्णी अर्क तयार केला. हा अर्क नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आला असून तो पिकांवरील किड नियंत्रणासाठी प्रभावी मानला जातो.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय व नैसर्गिक शेतीबाबत जागृती निर्माण होत असून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचा मार्ग खुला होत असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

