पनवेलसाठी सिडकोने अतिरिक्त पाणी उपलब्ध करून द्यावे – खासदार श्रीरंग बारणे

पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी सिडको प्रशासनाला खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नागरी सुविधा आणि विकासकामांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

May 10, 2026 - 15:17
 0  5
पनवेलसाठी सिडकोने अतिरिक्त पाणी उपलब्ध करून द्यावे – खासदार श्रीरंग बारणे
श्रीरंग बारणे, पनवेल पाणीटंचाई, सिडको, खारघर पाणीपुरवठा

 प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सिडको प्रशासनाला खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

खासदार बारणे यांनी बेलापूर येथील सिडको कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि व्यवस्थापकीय उपसंचालक गणेश देशमुख यांच्यासोबत मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेतली.

वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाई गंभीर

बैठकीत खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा मुद्दा प्रमुखत्वाने उपस्थित करण्यात आला. या भागात सिडकोच्या परवानगीने मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारण्यात आले असून, पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

पनवेलमधील काही भाग पूर्वी सिडकोच्या अखत्यारित होता, मात्र तो आता महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे पाणी समस्येच्या निराकरणाची मोठी जबाबदारी सिडकोवर असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोकडे अतिरिक्त पाणी उपलब्ध असल्याने ते पनवेल महापालिकेला देण्याची मागणीही त्यांनी केली.

नागरी सुविधा आणि विकासकामांवर चर्चा

बैठकीदरम्यान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणे, वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यावरही चर्चा झाली. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, विनोद साबळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, अमर म्हात्रे आदी उपस्थित होते.

महापौरांसोबतही पाणीप्रश्नावर चर्चा

दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेलचे महापौर नितीन पाटील यांची भेट घेत शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. उन्हाळा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.

शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

या बैठकीस स्थायी समिती अध्यक्ष बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अर्जुन म्हात्रे तसेच विविध नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0