रायगडमध्ये एसपी आँचल दलाल यांचा मोठा दणका; तब्बल ६ पोलीस कर्मचारी निलंबित
रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. संशयित वाहन तपास प्रकरणातील नियमबाह्य कार्यपद्धती आणि शिस्तभंगामुळे ही कारवाई करण्यात आली.
प्रतिनिधी: दिपक शिंदे
रायगड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (LCB) एक मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पोलीस दलातील शिस्तभंग आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होते, याचा प्रत्यय नुकताच आला असून रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी एकाच वेळी तब्बल सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
या धडक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून शिस्तभंग करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे.
संशयित वाहन तपासातून प्रकरण उघड
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी रोहा तालुक्यातील वरसगाव-कमानी परिसरात एक संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन उभे असल्याचे आढळले होते. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे १ लाख रुपये किमतीचे तांबे तसेच स्टील धातूचे अंदाजे २०० किलो वजनाचे तुकडे सापडले होते.
या प्रकरणाची प्राथमिक नोंद कोलाड पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपात करण्यात आली होती. पुढील तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आली होती.
तपासात नियमबाह्य कार्यपद्धती
तपासादरम्यान संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती नियमबाह्य आणि संशयास्पद असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, हवालदार संदीप पहेलकर यांच्यासह बाबासो पिंगळे, मोरेश्वर ओमले, ओंकार सोंडकर आणि लालासो वाघमोडे यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गैरवर्तणुकीमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
एसपींची कठोर कारवाई
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सहाही कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. हे कर्मचारी सेवेत राहिल्यास विभागीय चौकशीवर प्रभाव टाकू शकतात, या शक्यतेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबन काळात हजेरी बंधनकारक
निलंबित कर्मचाऱ्यांना रायगड-अलिबाग नियंत्रण कक्ष येथे दररोज दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांचे शासकीय ओळखपत्र आणि किट तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निलंबन काळात त्यांना कोणताही खासगी व्यवसाय किंवा नोकरी करण्यास मनाई असेल. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू होणार असून चौकशीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

