बनावट कागदपत्रांद्वारे दस्त नोंदणी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश; पुढील मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व मालमत्ता व्यवहार केल्याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि मुद्रांक विभागाने संयुक्त टास्क फोर्स स्थापन करून पुढील मंगळवारपर्यंत कार्यवाही अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई, दि. 10 : छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करून जमीन व मालमत्ता व्यवहार केल्याच्या गंभीर प्रकरणांची तातडीने चौकशी करून कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील मंगळवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
मंत्रालयात आयोजित बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मुद्रांक महानिरीक्षक रविंद्र बिनवडे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, जालनाचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू तसेच मुद्रांक, पोलीस आणि सहकार विभागाचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
मंत्री अतुल सावे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन कठोर निर्देश दिले.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बनावट खरेदीखते, खोटी वारस प्रमाणपत्रे, दस्तांमध्ये फेरफार, शासनाची फसवणूक, दुबार विक्री आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी या सर्व प्रकरणांमागे कार्यरत असलेल्या संघटित साखळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करून नागरिकांच्या मालमत्ता परस्पर विकण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट दाखले तयार करण्यात आल्याची बाबही समोर आली आहे.
आतापर्यंत या प्रकरणात 16 गुन्हे दाखल झाले असून केवळ गुन्हे नोंदवून थांबता कामा नये, तर संघटित गुन्हेगारीच्या दृष्टीने सखोल तपास करून संबंधितांवर मोका (MCOCA) किंवा तडीपार यांसारखी कठोर कारवाई करण्याचा विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री अतुल सावे यांनी संबंधित आरोपींवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या सखोल तपासातून आणखी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असून मुद्रांक विभाग आणि पोलीस विभागाने समन्वयाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी पोलीस आणि मुद्रांक विभागाच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले असून, पुढील मंगळवारपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यास सांगितले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0