वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढा; महावितरणाचा गलथान कारभार खपवून घेणार नाही – खासदार श्रीरंग बारणे

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण, नेरळ आणि कर्जत परिसरातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. वाढत्या ग्राहकसंख्येनुसार डीपी आणि सबस्टेशनची क्षमता वाढविणे, अंडरग्राऊंड केबल प्रकल्प राबविणे आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

Jun 16, 2026 - 04:52
 0  2
वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढा; महावितरणाचा गलथान कारभार खपवून घेणार नाही – खासदार श्रीरंग बारणे
श्रीरंग बारणे, वीज समस्या, महावितरण, पनवेल वीजपुरवठा

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण, नेरळ आणि कर्जत परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. भविष्यात नागरिकांना दहा ते बारा तास वीज खंडित होण्यासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पनवेल महानगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या विद्युत विभागाच्या आढावा बैठकीत खासदार बारणे बोलत होते. बैठकीस विद्युत अधीक्षक अभियंता दीपक पाटील, अधीक्षक अभियंता धिरज बिक्कड, कार्यकारी अभियंता जितेंद्र माने, कार्यकारी अभियंता देशमुख, उपकार्यकारी अभियंता संजय ठाकूर, श्रीनिवास बोबडे, चंद्रकांत केंद्रे, अमित कुरंगळे, वाघमोडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पनवेल शहरातील कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी परिसरातील वीजपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पनवेल, उरण, नेरळ आणि कर्जत विभागातील वीज प्रवाह आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावाही घेण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि ग्राहकसंख्येनुसार नवीन सबस्टेशन उभारणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे.

त्यांनी सांगितले की, शहरी भागात चार तर ग्रामीण भागात तीन नवीन सबस्टेशन उभारण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांत ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यातील वीज समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल.

पावसाळ्यापूर्वी जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांची बदली करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. कामोठे येथील पाच केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून २२० केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा फायदा खारघर परिसरालाही होणार आहे.

पनवेल शहरात १५५ कोटी रुपयांच्या अंडरग्राऊंड केबल प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर शहरात शंभर टक्के अंडरग्राऊंड केबल नेटवर्क उभारले जाईल. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये मोठी घट होणार आहे.

खासदार बारणे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना डीपीची क्षमता वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश दिले. महावितरणचा गलथान कारभार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0