सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष कार्यशाळा
केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विशेष कार्यशाळेचे आयोजन केले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर उभारण्यासाठी कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण, वैज्ञानिक प्रक्रिया आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ६ जून २०२६ : केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्रमांक एस.ओ. ३८८ (अ) द्वारे घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ जाहीर केले असून, १ एप्रिल २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या नियमांची सविस्तर माहिती देण्यासाठी व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घनकचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर घडवण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मोठ्या आस्थापनांना नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार असून, शहर विद्रूप करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक नागरिकाने शहराला स्वतःचे घर समजून स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गृहनिर्माण संस्थांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देत, लोकसहभागातूनच स्वच्छ आणि सुंदर शहर उभारणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच फूटपाथ, रस्ते आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
भविष्यात पिंपरी-चिंचवड शहर देशातील स्वच्छ आणि आदर्श शहरांमध्ये अग्रस्थानी असेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शहर विकासासाठी नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी आयुक्तांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्यान, पर्यावरण आणि आरोग्य विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0