चिखली-कुदळवाडीत पहाटे अतिक्रमण कारवाई; पाच धार्मिक स्थळे हटवल्याचा नागरिकांचा आरोप, परिसरात संताप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली-कुदळवाडी परिसरात पहाटे अतिक्रमणविरोधी कारवाई केली. या कारवाईत मुस्लिम समाजाशी संबंधित पाच धार्मिक स्थळे हटविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत

Jun 10, 2026 - 20:19
 0  5
चिखली-कुदळवाडीत पहाटे अतिक्रमण कारवाई; पाच धार्मिक स्थळे हटवल्याचा नागरिकांचा आरोप, परिसरात संताप
चिखली कुदळवाडी कारवाई, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अतिक्रमण

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

चिखली-कुदळवाडी परिसरात ९ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुस्लिम समाजाशी संबंधित पाच धार्मिक स्थळे हटविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून परिसरात नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाईपूर्वी ८ जून रोजी अर्शद अस्लम खान आणि परिसरातील रहिवाशांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात कारवाई प्रक्रियेत पारदर्शकता राखावी तसेच कोणत्याही एका समाजाला लक्ष्य केल्याचा आभास निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

नागरिकांनी असा दावा केला आहे की, शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्यात आली आहेत. त्यामुळे चिखली-कुदळवाडी परिसरातील रहिवाशांनाही समान न्याय मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पाणीपुरवठा, मलनिस्सारण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, यापूर्वी १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या कारवाईत प्रार्थनास्थळे, दुकाने, लघुउद्योग आणि काही घरे हटविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे सांगितले जात आहे.

निवेदन दिल्यानंतर काही तासांतच कारवाई झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. "जर सर्वांवर समान कारवाई होत असेल, तर विशिष्ट भागातच वारंवार कारवाई का केली जाते?" असा सवाल काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अर्शद अस्लम खान यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "महापालिकेने कायद्याचे राज्य कायम ठेवावे. मात्र कोणत्याही समाजाला लक्ष्य केल्याचा आभास निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. समान न्याय आणि पारदर्शकता हीच आमची प्रमुख मागणी आहे."

दरम्यान, या कारवाईनंतर परिसरात भीती, असुरक्षितता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने पुढील लढा देण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

(महापालिकेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल.)

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0