दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा शुभारंभ; ५ लाख देशी वृक्ष लागवडीचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गादेवी टेकडी येथे ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महापालिकेने शहरात ५ लाख देशी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

Jun 6, 2026 - 19:27
 0  4
दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा शुभारंभ; ५ लाख देशी वृक्ष लागवडीचा संकल्प
पिंपरी चिंचवड, दुर्गादेवी टेकडी, हरित पिंपरी चिंचवड, माझी वसुंधरा

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ५ जून २०२६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दुर्गादेवी टेकडी येथे ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील विविध ठिकाणी पाच लाख देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प महापालिकेने जाहीर केला.

कार्यक्रमात बोलताना महापौर रवि लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. अभियानाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दुर्गादेवी टेकडीवर १,००० देशी रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय जगताप लिखित ‘दुर्गा टेकडीचा ५० वर्षांचा इतिहास’ या माहितीपूर्ण पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्या शैलजा मोरे, अरुणा लंगोटे, नगरसदस्य कुशाग्र कदम, नीलेश नेवाळे, अमित गावडे, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोज सेठीया यांच्यासह भारतीय लष्कराचे ब्रिगेडीअर प्रकाश भारती, कर्नल अनिल फाटक, पोलीस उपआयुक्त विक्रम देशमुख, वृक्षमित्र प्रकाश करमाळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल भोंडवे, प्रा. नामदेव जाधव, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण दिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह ते दुर्गादेवी टेकडी दरम्यान १० किलोमीटर सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शेकडो सायकलप्रेमींनी सहभाग घेतला.

खासदार श्रीरंग बारणे यांनी वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. आमदार अमित गोरखे यांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करण्याची गरज व्यक्त केली. आमदार उमा खापरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांनी स्वतः झाडे लावून इतरांनाही प्रेरित करावे, असे मत व्यक्त केले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुर्गादेवी टेकडी ही पिंपरी-चिंचवड शहराची अमूल्य नैसर्गिक संपदा असल्याचे सांगितले. शहरातील वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी यंदा विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दुर्गादेवी टेकडीला राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख पर्यटन व पर्यावरणीय आकर्षण केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी दुर्गादेवी टेकडीच्या विकासामागील शिल्पकारांचेही स्मरण करण्यात आले. महानगरपालिकेचे पहिले प्रशासक हरनामसिंग, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंढे आणि तत्कालीन मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांच्या दूरदृष्टीमुळे ओसाड आणि खडकाळ टेकडीचे रूपांतर आजच्या हिरव्यागार दुर्गादेवी टेकडी उद्यानात झाले असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेत पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण आणि प्रदूषणमुक्त भारत घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. शपथेचे वाचन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0