पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण; ५०० हून अधिक लाभार्थ्यांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास व सुरक्षा प्रशिक्षण सुरू असून आतापर्यंत ५०० हून अधिक कचरा वेचकांनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणाद्वारे आरोग्य, सुरक्षा, आर्थिक साक्षरता आणि शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे.

Jun 9, 2026 - 20:08
 0  4
पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण; ५०० हून अधिक लाभार्थ्यांचा सहभाग
पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण;

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ८ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) अंतर्गत शहरातील कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास आणि सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत ५०० हून अधिक कचरा वेचकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

एनएसकेएफडीसीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई) योग्य वापर, प्रथमोपचार, आर्थिक साक्षरता, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जात आहे. याशिवाय लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत योजना, स्वयंसहाय्यता गटांची स्थापना आणि आधुनिक कचरा संकलन वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदान योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून, उर्वरित कचरा वेचकांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांना या प्रशिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि ‘स्किल इंडिया’ यांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

शहराच्या स्वच्छता व्यवस्थेमध्ये कचरा वेचकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या आरोग्याचे संरक्षण, कामातील सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या उपक्रमाद्वारे कचरा वेचकांना सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांशी जोडण्याचे कामही प्रभावीपणे केले जात असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे कचरा वेचकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार असून त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम जीवन जगण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0