विश्वमाता माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर; शनिवारी निगडी येथे सन्मान सोहळा
विश्वमाता माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना मराठी पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी निगडी येथील मठात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; ज्येष्ठ संपादक, पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांची उपस्थिती
पिंपरी, पुणे | प्रतिनिधी
निःस्वार्थ प्रेम, माया, करुणा आणि मानवतेच्या सेवेचा संदेश जगभर पोहोचविणाऱ्या विश्वमाता माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मानवसेवा, आध्यात्मिक कार्य आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता निगडी-यमुनानगर येथील माता अमृतानंदमयी मठात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अम्मा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुढारी माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव असणार आहेत.
या सोहळ्याला विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे ज्येष्ठ संपादक, पत्रकार, लोकप्रतिनिधी तसेच उद्योजक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दैनिक सकाळच्या संपादक शीतल पवार, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी पुणेचे संपादक सुनील माळी, जय महाराष्ट्र चॅनलच्या संपादक वृषाली कदम आणि दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये यांचा समावेश आहे.
तसेच आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, व्ही. जे. डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जावडेकर, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रेम, करुणा आणि मानवसेवेच्या कार्याचा गौरव
माता अमृतानंदमयी देवी यांनी आपल्या प्रेम, करुणा, मानवसेवा आणि आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून भारतासह जगभरात मानवतेचा संदेश पोहोचविला आहे. समाजातील गरजू, गरीब आणि वंचित घटकांसाठी त्यांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण आणि मानवतावादी कार्याच्या माध्यमातून त्यांनी असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य केले आहे.
त्यांच्या या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच मातृत्व, माणुसकी आणि निःस्वार्थ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी सांगितले.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा
मानवतेची सेवा, निःस्वार्थ प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणाऱ्या अम्मा यांच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी केले आहे.