महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात पुसदमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार; १२ तास अखंडित वीजपुरवठ्याची मागणी
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात महावितरणच्या अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निंबी, पार्डी, गणेशपूर आणि कवडीपूर परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत दिवसा किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आणि पीक नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली.
यवतमाळ, प्रतिनिधी : रवी वाघमारे
निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना आता अपुऱ्या आणि अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये २४ तासांपैकी अवघे सहा तास वीज मिळत असून त्यातही वारंवार खंड पडत असल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निंबी, पार्डी, गणेशपूर, कवडीपूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पुसद येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत लेखी निवेदन सादर केले. दिवसा किमान १२ तास अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वाढती महागाई, खत-बियाण्यांचे वाढते दर, मजुरीचा खर्च आणि निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेती आधीच तोट्यात गेली आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्याने सिंचनावर परिणाम होत असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अद्याप चिंताजनक असल्याचे नमूद करत, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारकडून कृषी पंपांसाठी वीजपुरवठ्याच्या मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील फिडर्स आणि ट्रान्सफॉर्मरची अवस्था अत्यंत खराब असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
निवेदनात शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये कृषी पंपांसाठी किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा, ग्रामीण भागातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर व फिडर्सची तातडीने दुरुस्ती, तसेच विजेअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महावितरण प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि पिकांचे नुकसान सुरूच राहिल्यास पुसद येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना गजानन दत्तात्रय जाधव, गणेश सावंत, दीपक मोरे, संतोष आंबोरे, अरुण नागुलकर, पंजाबराव ढेकळे, मामा जाधव, दिगंबर देशमुख, संतोष अनकुळे, रमेश भोणे, रवी मारोटकर, मल्हारी मुळे, अजय गरड, शेतकरी मित्र मधुकर चव्हाण, रमेश डंबोळे, शांतीसागर इंगोले यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे आता महावितरण प्रशासन आणि शासन यांची भूमिका काय राहणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0