पुसदकरांच्या हक्काच्या घराचा मार्ग मोकळा; हजारो कुटुंबांचे स्वप्न होणार साकार
पुसद शहरातील अतिक्रमण धारकांच्या हक्काच्या घराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आखीव पत्रिका देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी | रवि वाघमारे
पुसद शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमण धारकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील अतिक्रमण धारकांना आखीव पत्रिका (नमुना ड) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे शहरातील शेकडो नव्हे तर हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या उंबरठ्यावर आले असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अनेक वर्षांचा प्रश्न सुटला
नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. जागेची मोजणी करून नगररचना नियमावलीनुसार भूखंडांचे अभिन्यास (ले-आऊट) तयार करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रस्ताव मंजुरीसाठी नगररचना विभागाकडे पाठविण्यात आले होते.
या सर्व प्रक्रियेसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला.
दोन वॉर्डांना मंजुरी
पुसद शहरातील शिवाजी वॉर्ड आणि नवलबाबा वॉर्ड या दोन प्रभागांच्या अभिन्यासाला नगररचना विभाग, पुणे यांच्याकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता संबंधित लाभार्थ्यांना आखीव पत्रिका देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
उर्वरित वॉर्डांनाही लवकरच दिलासा
उर्वरित वॉर्डांतील प्रलंबित प्रकरणांची नियमानुसार कार्यवाही सुरू असून त्यांनाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिलेले आश्वासन पूर्ण करणार
याबाबत प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक म्हणाल्या की, नगर परिषद निवडणुकीदरम्यान अतिक्रमण धारकांना हक्काचे घर मिळवून देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
त्या पुढे म्हणाल्या, शिवाजी आणि नवलबाबा वॉर्डांच्या अभिन्यासाला मंजुरी मिळाली असून उर्वरित वॉर्डांमधील कामेही युद्धपातळीवर पूर्ण केली जातील.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ
मंजुरी मिळालेल्या अभिन्यासातील लाभार्थी आता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आभार व्यक्त
या लोकाभिमुख निर्णयाबद्दल नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल विभागाचे विशेष आभार मानले आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

