जनगणना हा देशाच्या विकासाचा कणा; स्वगणना लोकचळवळ बनवा – जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ जिल्ह्यातील जनगणना प्रशिक्षण केंद्राला भेट देत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जनगणना प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी स्वगणना संकल्पना तळागाळात पोहोचवून अचूक माहिती संकलनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

May 6, 2026 - 21:04
 0  61
जनगणना हा देशाच्या विकासाचा कणा; स्वगणना लोकचळवळ बनवा – जिल्हाधिकारी विकास मीना
जनगणना 2027, स्वगणना, यवतमाळ

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवि वाघमारे 

यवतमाळ : जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या नियोजनाचा भक्कम कणा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा सहभाग या प्रक्रियेत अत्यावश्यक असून स्वगणना ही संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले.

आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील कलगाव येथील माउंट लिट्रा झी स्कूलमध्ये आयोजित जनगणना प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी थेट संवाद साधत जनगणना प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले.

जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले की, जनगणनेतून मिळणारी आकडेवारी देशाच्या भविष्यातील धोरणे, विकासकामे आणि योजनांची दिशा ठरवते. त्यामुळे माहिती संकलन करताना अचूकता आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षण केंद्रातील व्यवस्थेची पाहणी करताना त्यांनी तांत्रिक अडचणी, नागरिकांशी संवाद साधण्याची पद्धत तसेच माहिती नोंदविताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष संवादामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा आत्मविश्वास वाढल्याचे यावेळी दिसून आले.

या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी राम मुळे, तहसीलदार अभय मस्के, नायब तहसीलदार (निवडणूक) वैभव पवार तसेच मंडळ अधिकारी प्रकाश माने आणि मारोती एकूलवार उपस्थित होते. त्यांनीही शिक्षकांना जनगणना कार्य वेळेत आणि निर्दोषपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

जनगणना हे राष्ट्रीय कार्य असल्याने त्यात कोणतीही कसूर राहू नये, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासन आणि शिक्षकांनी समन्वयाने काम करून आगामी जनगणना यशस्वी करण्याचे आवाहन केले.

महागाव तालुक्यात जनगणना प्रक्रियेची तयारी आता युद्धपातळीवर सुरू झाल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0