कलगाव–गुंज रस्त्याची १० वर्षांपासून दुरवस्था; ८ दिवसांत काम सुरू न झाल्यास बेमुदत चक्काजामचा इशारा

महागाव तालुक्यातील कलगाव–गुंज रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Jul 6, 2026 - 21:57
 0  3
कलगाव–गुंज रस्त्याची १० वर्षांपासून दुरवस्था; ८ दिवसांत काम सुरू न झाल्यास बेमुदत चक्काजामचा इशारा
कलगाव गुंज रस्ता, महागाव, यवतमाळ, रस्ता दुरुस्ती

यवतमाळ प्रतिनिधी रवी वाघमारे 

यवतमाळ | ६ जुलै २०२६ : महागाव तालुक्यातील कलगाव–गुंज हा प्रमुख मार्ग गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ अत्यंत खराब अवस्थेत असून रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार मागण्या करूनही कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सवाना, गुंज, कलगाव, वेणी आणि वाकोडी येथील ग्रामस्थांनी महागावचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या नावे निवेदन सादर केले. निवेदनात रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा मार्ग महागाव तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असून गेल्या अनेक वर्षांपासून तो खड्डेमय आणि चिखलमय अवस्थेत आहे. अनेकवेळा निवेदने, आंदोलने आणि उपोषणे करूनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मार्गावर साखर कारखाना, सूतगिरणी तसेच इतर औद्योगिक प्रकल्प असल्यामुळे ऊस आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक याच रस्त्याने होते. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान, वाढलेला वाहतूक खर्च आणि माल पोहोचविण्यात होणारा विलंब याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

रस्त्यालगत आयटीआय महाविद्यालय, सैनिकी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी दररोज या मार्गावरून प्रवास करतात. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून विद्यार्थ्यांना वेळेत शाळा आणि महाविद्यालयात पोहोचण्यात अडचणी येत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

आरोग्य सेवांवरही या रस्त्याच्या दुरवस्थेचा गंभीर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गंभीर रुग्ण किंवा गर्भवती महिलांना उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेला वेगाने धावणे शक्य होत नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, निवेदन दिल्यापासून आठ दिवसांच्या आत रस्त्याच्या दुरुस्तीचे किंवा नूतनीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर संपूर्ण महागाव तालुक्यात बेमुदत चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासनाची राहीलt, असेही निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रती महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनाही देण्यात आल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणती ठोस भूमिका घेते, याकडे महागाव तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1