आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची पालिका रुग्णालयांमध्ये अचानक पाहणी; आरोग्य सेवांचा घेतला प्रत्यक्ष आढावा
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केईएम, सायन आणि राजावाडी रुग्णालयांना अचानक भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. पावसाळ्यातील आपत्कालीन तयारी, औषधसाठा, स्वच्छता आणि रुग्णसेवेची गुणवत्ता तपासून अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
मुंबई | ६ जुलै २०२६ : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सोमवारी मुंबईतील प्रमुख पालिका रुग्णालये – केईएम रुग्णालय, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण (सायन) रुग्णालय आणि पं. मदन मोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका सर्वसाधारण (राजावाडी) रुग्णालय – यांना अचानक भेट देत आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला.
पाहणीदरम्यान बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आपत्कालीन विभाग, विविध वॉर्ड, अतिदक्षता विभाग, स्वच्छता व्यवस्था, औषध वितरण प्रणाली, वैद्यकीय उपकरणांची कार्यस्थिती तसेच रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. रुग्णालयांचे अधिष्ठाता, प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि विभागप्रमुख यांच्याशी चर्चा करून विविध विभागांच्या कामकाजाची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
यावेळी हरिष भांदिर्गे यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधत उपचारांची गुणवत्ता, औषधांची उपलब्धता, प्रतीक्षा कालावधी, स्वच्छता आणि इतर सुविधांबाबत अभिप्राय घेतला. नागरिकांनी मांडलेल्या सूचना आणि तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार, जलजन्य आजार, अपघात आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णालयांची पूर्वतयारी, औषधसाठा, रक्तसाठा, आवश्यक वैद्यकीय साहित्य, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि आपत्कालीन यंत्रणेची सज्जता याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवा अखंडित राहावी आणि प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान डॉक्टर, परिचारिका, निवासी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी समर्पित भावनेने सेवा बजावत असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. त्यांच्या कार्याचे कौतुक करत वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सेवा अधिक जलद, गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी हरिष भांदिर्गे म्हणाले, "मुंबईकरांना सर्वोत्तम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही मुंबई महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विशेषतः पावसाळ्यात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत असल्याने रुग्णालयांची सज्जता आणि सेवांची गुणवत्ता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. अशा अचानक पाहण्यांमुळे प्रत्यक्ष परिस्थिती समोर येते, त्रुटी तातडीने दूर करता येतात आणि नागरिकांना अधिक प्रभावी आरोग्य सेवा देता येते."
ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य समिती नागरिकांना अधिक सक्षम, कार्यक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, यापुढेही मुंबईतील विविध पालिका रुग्णालयांना अशाच प्रकारच्या अचानक भेटी देऊन आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत आवश्यक सुधारणा करण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक आधुनिक, सक्षम आणि लोककेंद्रित करण्यासाठी विविध उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असून प्रत्येक मुंबईकराला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी हरिष भांदिर्गे यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0