फेसबुकवर पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; उमरखेड पोलिसांकडून तपास सुरू
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे फेसबुक ग्रुपमध्ये पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे.
रवि वाघमारे | यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड येथे सोशल मीडियावरील एका फेसबुक ग्रुपमध्ये देशाच्या पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘यवतमाळ ग्रुप’ नावाच्या फेसबुक ग्रुपमध्ये दिपक जिठ्ठे नावाच्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित ग्रुपमध्ये सुमारे ९,५०० हून अधिक सदस्य असल्याने ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.
तक्रारीनुसार, पोस्टमधील मजकूर गंभीर, असभ्य आणि बदनामीकारक स्वरूपाचा असून त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नितीन भुतडा यांची लेखी तक्रार
भाजपचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी या प्रकरणी उमरखेड पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित पोस्ट जाणीवपूर्वक आणि द्वेष पसरवण्याच्या हेतूने करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.
डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू
तक्रारदाराने पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेषतः पोस्टचा मूळ स्रोत शोधण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांक, IP अॅड्रेस आणि इतर डिजिटल पुरावे तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांकडून तांत्रिक तपास
उमरखेड पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित पोस्ट आणि त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
