सायबर जनजागृती आणि डिजिटल साक्षरता ही काळाची गरज; कोल्हापूरातून ‘डिजिटल इम्युनिटी’ पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे ‘डिजिटल इम्युनिटी : सायबर सुरक्षितता’ या पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ झाला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सायबर जनजागृती आणि डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असल्याचे सांगत हा उपक्रम राज्यभर टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Jul 5, 2026 - 01:46
 0  1
सायबर जनजागृती आणि डिजिटल साक्षरता ही काळाची गरज; कोल्हापूरातून ‘डिजिटल इम्युनिटी’ पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ
डिजिटल इम्युनिटी, सायबर सुरक्षितता, अदिती तटकरे, कोल्हापूर,

कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव 

महिला, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल इम्युनिटी : सायबर सुरक्षितता’ या पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक येथे करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी सायबर जनजागृती आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील अत्यावश्यक गरज असल्याचे सांगितले. महिला आणि मुलींसाठी सायबर सुरक्षेचे प्रभावी उपाय समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आयोग, कायदेमंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रशिक्षण अधिक संवादात्मक करण्याचे आणि सहभागींचे प्रश्न, अनुभव व अडचणी लक्षात घेऊन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव पदमश्री बनाडे, सहसंचालक शिक्षण कमलादेवी आवटे, सायबर पोलीस, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरातील हा पथदर्शी उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. माध्यमिक शाळांमध्ये आठवड्यातून एक तास डिजिटल सुरक्षिततेसाठी राखीव ठेवण्याची तसेच या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचा अधिक सहभाग वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन करत सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने डिजिटल साक्षर होण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.

कोल्हापूरातून सुरू झालेला हा पथदर्शी उपक्रम पुढील काळात राज्यभर टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वाढता वापर लक्षात घेता ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी फसवणूक, सायबर छळ, सोशल मीडियाचा गैरवापर आणि इतर सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या अभियानाची आखणी करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणामध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडियाचा जबाबदार वापर, डिजिटल गोपनीयता, सायबर कायदे, तक्रार निवारण यंत्रणा, इंटरनेट व्यसन, सायबर लैंगिक गुन्हे, डिजिटल वेलनेस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा सुरक्षित वापर अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

अहान फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली पाटणकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष जोशी यांनी सायबर सुरक्षितता, सायबर कायदे, डिजिटल सुरक्षा आणि सायबर वेलनेस या विषयांवर मार्गदर्शन केले. गुगल इंडियाचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी समीर जाधव यांनी ‘गुगल किड्स ट्रस्ट अँड सेफ्टी’ या विषयावर माहिती दिली, तर ‘महातत्त्व’च्या दिप्ती सहानी यांनी गुगल सेफ्टी टूल्सविषयी विशेष सत्र घेतले.

कार्यक्रमात मार्गदर्शक सोनाली पाटणकर, उन्मेष जोशी आणि समीर जाधव यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून सायबर सुरक्षिततेचा संदेश राज्यभर पोहोचविणे, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी सांगितले. त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे प्रसार करण्याचे आवाहनही केले. :::

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0