नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाला वेग; विदर्भाच्या विकासाचे ‘इंजिन’ ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जीएमआर समूहाकडे हस्तांतरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात नागपूर विमानतळ विदर्भ, मध्य भारत आणि उद्योग विकासाचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Jun 26, 2026 - 20:33
 0  10
नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाला वेग; विदर्भाच्या विकासाचे ‘इंजिन’ ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर विमानतळ, जीएमआर, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

नागपूर, दि. २५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण, विस्तार आणि विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत विमानतळाचे जीएमआर समूहाकडे अधिकृत हस्तांतरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन, डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग, कृषी आणि पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन ठरणार आहे.

ते म्हणाले की, २०१८ मध्ये विमानतळ विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. २०१९ मध्ये जीएमआर कंपनीची निवड झाली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर केंद्र सरकारच्या मंजुरीने हा प्रकल्प मार्गी लागला असून आता विमानतळाच्या आधुनिकीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

दोन धावपट्ट्या, दोन टर्मिनल आणि जागतिक दर्जाच्या सुविधा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वाढत्या प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेसाठी दोन धावपट्ट्या आणि दोन टर्मिनल उभारणे आवश्यक आहे. विमानतळाला मेट्रो आणि उत्कृष्ट रस्ते संपर्क आधीच उपलब्ध असून भविष्यात आणखी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित केली जाणार आहे. पुढील एका वर्षात प्रवाशांना विमानतळावर मोठे सकारात्मक बदल दिसतील, तर २०२९ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

नागपूर बनेल लॉजिस्टिक आणि कार्गो हब

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. विमानतळामुळे नागपूर देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक आणि कार्गो हब म्हणून अधिक बळकट होईल. विदर्भातील उद्योग, खनिज संपदा, कृषी उत्पादन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. तसेच देशातील प्रमुख महानगरांशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणी अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या विकासाचा ‘टेक-ऑफ’

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी विमानतळ हस्तांतरणाला विदर्भाच्या विकासाचा ‘टेक-ऑफ’ असे संबोधले. सध्या वर्षाला सुमारे ३० लाख प्रवाशांची क्षमता असलेला विमानतळ भविष्यात ६० लाख प्रवासी क्षमता गाठेल आणि पुढे ३ कोटी प्रवासी क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूरहून दुबई, सिंगापूर तसेच युरोप, अमेरिका आणि इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोबोटच्या सहाय्याने आधुनिक हस्तांतरण सोहळा

विमानतळ हस्तांतरण सोहळा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पार पडला. रोबोटच्या सहाय्याने फित कापून मान्यवरांनी विमानतळात प्रवेश केला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण, तर केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते जीएमआर नागपूर विमानतळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रकल्पामुळे नागपूरची हवाई जोडणी, कार्गो सुविधा, पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, माया इवनाते, श्यामकुमार बर्वे, आमदार परिणय फुके, संजय मेश्राम, समीर मेघे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जीएमआरचे व्यावसायिक अध्यक्ष जी.बी.एस. राजू, नागपूर मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1