सीएचएमई भोसला मिलिटरी कॉलेजतर्फे ७ जुलैला ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वॉकथॉन'; आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापना दिनानिमित्त ७ जुलै रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वॉकथॉन' आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य, तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Jul 3, 2026 - 16:19
 0  5
सीएचएमई भोसला मिलिटरी कॉलेजतर्फे ७ जुलैला ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वॉकथॉन'; आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश
सीएचएमई, भोसला मिलिटरी कॉलेज, वॉकथॉन, ज्येष्ठ नागरिक, नाशिक,

नाशिक | ब्युरो

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (सीएचएमई)च्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापना दिनानिमित्त ७ जुलै रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष 'वॉकथॉन' आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. वॉकथॉनमध्ये ६० ते ७० वर्षे (७ किलोमीटर), ७० ते ८० वर्षे (५ किलोमीटर) आणि ८० वर्षांवरील (३ किलोमीटर) असे तीन गट करण्यात आले आहेत. नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकांसह हौशी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संघटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात येईल. स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या वॉकथॉनचा उद्देश केवळ चालण्याची स्पर्धा आयोजित करणे नसून, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उत्तम आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. तसेच भोसला कॅम्पस आणि तेथील विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचाही या उपक्रमामागील उद्देश आहे.

७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता भोसला मिलिटरी स्कूलमधील हुतात्मा स्मारकापासून प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकथॉनला प्रारंभ होईल. यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी भोसला सावरकर प्रवेशद्वार – बापू पूल – गोदापार्क – दत्त मंदिर चौक – निर्मला स्कूल – सोनवणे चौक – भोसला कॉलेज असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धेचा समारोप भोसला महाविद्यालय परिसरात होणार आहे.

आयोजनाची सर्व तयारी पूर्णत्वास आली असून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक नियोजनात सहभागी झाले आहेत. विविध ज्येष्ठ नागरिक संघ, जॉगिंग गट आणि सामाजिक संस्थांमार्फत नोंदणी सुरू असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इच्छुकांना शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी ॲड. भिडे यांनी या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करत अधिकाधिक नाशिककरांनी आरोग्य जनजागृतीच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. श्री. वैद्य यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार परिषदेला कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ. विजयप्रसाद अवस्थी, प्राचार्य डॉ. आर. पी. पाटील, क्रीडासंचालक केतन जाधव, संतोष जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0