महाराष्ट्रातील सात मान्यवरांना पद्म पुरस्कार; अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, रोहित शर्मासह सहा जणांना पद्मश्री

राष्ट्रपती भवनात आयोजित पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांचा गौरव करण्यात आला. प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेते आर. माधवन, डॉ. आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या धिंडा, अशोक खाडे आणि दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Jun 24, 2026 - 18:04
Jun 24, 2026 - 22:26
 0  16
महाराष्ट्रातील सात मान्यवरांना पद्म पुरस्कार; अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, रोहित शर्मासह सहा जणांना पद्मश्री
पद्म पुरस्कार 2026, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, पद्मभूषण, पद्मश्री,

नवी दिल्ली, दि. 23 : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे पार पडले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

अलका याज्ञिक यांना पद्मभूषण

भारतीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. १६ हून अधिक भाषांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीतविश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे.

रोहित शर्मासह सहा जणांना पद्मश्री

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मांनी भारतीय क्रिकेटला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल नवजात शिशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १९८९ मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू करून आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

वारली आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक तारपा वाद्य जपणारे ८९ वर्षीय भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आर. माधवन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘थ्री इडियट्स’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामाची विशेष दखल घेण्यात आली.

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांचे बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी चार दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिले.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझगाव डॉकमधील नोकरीपासून सुरुवात करत त्यांनी ‘दास ऑफशोअर’ या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनीची स्थापना केली.

देशभरातील ६५ मान्यवरांचा गौरव

पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ६५ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये २ पद्मविभूषण, ७ पद्मभूषण आणि ५६ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता.

यंदा एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये १९ महिलांचा समावेश असून १६ जणांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1