दिल्लीतील म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री; पुरणपोळीचाही आस्वाद
दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्गावरील म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून १५ सप्टेंबरपर्यंत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. ५०० हून अधिक मूर्तींसह पूजासाहित्य आणि महाराष्ट्रीयन पुरणपोळी उपलब्ध राहणार आहे.
५०० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध; १,५०० ते २५ हजार रुपयांपर्यंत किंमत
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
नवी दिल्ली, दि. २७ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री सुरू होणार आहे. गणेशभक्तांसाठी हे प्रदर्शन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन देणे, त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशभक्तांना गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
३० वर्षांची गणेशमूर्ती प्रदर्शनाची परंपरा
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून दिल्लीमध्ये गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ३० हून अधिक गणेश मंडळांमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या प्रदर्शनाला गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
५०० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
यंदाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पेण येथील सपना जाधव आणि वीणा भट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कारागिरांनी तयार केलेल्या ५०० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती.
या मूर्ती शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आल्या आहेत. गणेशमूर्ती ६ इंचांपासून ३ फुटांपर्यंत विविध आकारांत उपलब्ध असून, त्यांची किंमत १,५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहे.
या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच महिला कारागिरांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
पूजासाहित्य आणि सजावटीच्या वस्तूही उपलब्ध
गणेशमूर्तींसोबतच गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य, पैठणीची तोरणे, आसने आणि अन्य पूजावस्तू म-हाटी एम्पोरियममध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे दिल्लीतील गणेशभक्तांना गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेली बहुतांश खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे.
गणेशमूर्ती खरेदीसोबत महाराष्ट्रीयन पुरणपोळीचा आस्वाद
या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे गणेशभक्तांना येथे गरमागरम महाराष्ट्रीयन पुरणपोळीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती आणि पूजासाहित्याच्या खरेदीसोबतच दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची चव अनुभवता येणार आहे.
मूर्ती बुकिंगसाठी संपर्काचे आवाहन
गणेशमूर्तींचे बुकिंग तसेच प्रदर्शनासंदर्भातील अधिक माहितीसाठी ०११-२३३६३८८८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
तसेच मूर्ती बुकिंगसाठी सपना जाधव – ९९७०२७७५५७ आणि वीणा भाट – ८९९९१२०९४९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशभक्तांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महाराष्ट्रातील मूर्तीकारांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची खरेदी करावी आणि गणेशोत्सवाच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कला व खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0